मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे सुमारे ८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटविण्याची नोटीस मध्य रेल्वेने मंदिर प्रशासनाला दिली. दादर स्थानकावर विकासात्मक कामे करण्यासाठी मंदिराच्या जागेचा अडसर होत आहे. मंदिर अनधिकृत असल्याने ते हटवून संबंधित जागा रेल्वे प्रशासनाच्या हवाली करावी, अन्यथा रेल्वे प्रशासन स्वत: मंदिर हटवेल, अशी नोटीस मध्य रेल्वेने मंदिर प्रशासनाला दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार भारतीय रेल्वे स्थानक विकास निगमद्वारे स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

हेही वाचा >>> Kirit Somaiya : दादरमधल्या हनुमान मंदिरावरुन राजकारण; किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र, “अनेक दशकं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानकात बदल करण्यासाठी पूर्वेकडील पादचारी पुलाशेजारी असलेले हनुमान मंदिर हटविण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाने पाठवली आहे. मध्य रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता (कार्यालय), भायखळा यांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे की, अनधिकृत मंदिरामुळे प्रवाशांची सुरळीत हालचाल, वाहनांची वाहतूक आणि दादर स्थानकावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मंदिर पाडून रेल्वेची जागा रिकामी करण्याचे निर्देश विश्वस्तांना दिले. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी चांगल्या पायाभूत सुविधा आणि सुलभतेची आवश्यकता आहे, असे सांगून या निर्णयाचे समर्थन केले. काहींनी मंदिर तिथेच असावे, असे बोलून रेल्वेच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला.