मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता आणि चांगल्या सुविधेसाठी आठ रेल्वेगाड्यांमधील जुन्या डब्यांच्या जागी नवीन लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) एलएचबी डबे कायमस्वरूपी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एलएचबी डबा आधुनिक, स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आला असून या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग उपकरणे आणि अग्निरोधक साहित्य यासारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

जुन्या पद्धतीच्या आयसीएफ डब्यांच्या तुलनेत या डब्यांचा वेग अधिक आहे. आयसीएफ डब्यांचा वेग १४० किमी प्रतितास आहे. तर, एलएचबी डब्यांचा वेग १६० किमी प्रतितास असून हा वेग २०० किमी प्रतितासापर्यंत वाढवता येईल. त्यामुळे भारतीय रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाडी क्रमांक २२१५७ सीएसएमटी – चेन्नई एक्स्प्रेस रेल्वेगाडीला एचएचबी डबे जोडून ही रेल्वेगाडी सीएसएमटी येथून १४ जानेवारीपासून चालविण्यात येईल. तर, गाडी क्रमांक चेन्नई – सीएसएमटी येथून १७ जानेवारीपासून चालविण्यात येईल. या रेल्वेगाडीच्या सुधारित संरचनेनुसार या रेल्वेगाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, पाच शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन असे एकूण १६ एलएचबी डबे असतील.

एलएचबी डबे जोडलेली पुणे-वेरावल एक्स्प्रेस ही पुणे येथून १५ जानेवारीपासून आणि वेरावल – पुणे एक्स्प्रेसला १७ जानेवारीपासून चालवण्यात येईल. पुणे – भगत की कोठी एक्स्प्रेसला १८ जानेवारीपासून, भगत की कोठी – पुणे एक्स्प्रेसला २१ जानेवारीपासून, पुणे-भुज एक्स्प्रेसला १९ जानेवारीपासून, भुज-पुणे एक्स्प्रेसला १५ जानेवारीपासून, कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला २० जानेवारीपासून, हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेसला २२ जानेवारीपासून, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसला २४ जानेवारीपासून, अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेसला २५ जानेवारीपासून, पुणे-अहमदाबाद एक्स्प्रेसला २१ जानेवारीपासून, अहमदाबाद-पुणे एक्स्प्रेसला २२ जानेवारीपासून एलएचबी डबे जोडले जातील.

देशात सर्वात पहिला एलएचबी डबा २००० साली जर्मनीहून आयात केला होता. ते डबे शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आले. पंजाबमधील कपूरथळा येथील रेल्वे कोच कारखाना, चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखाना आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथील माॅडर्न कोच कारखान्यात एलएचबी डबे तयार केले जातात. भारतीय रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्यांचे आयसीएफ रेल्वेगाड्यांच्या जागी एलएचबी डबे धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसन व्यवस्था, एलईडी विद्युत व्यवस्था, डिस्क ब्रेक यांचा समावेश आहे. तसेच जलद बचाव कार्यासाठी उघडता येणाऱ्या चार आपत्कालीन खिडक्या आणि ६ तास आपत्कालीन प्रकाश सुविधा असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.