मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे विलंबाने पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद लोकल कल्याण – ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल, एक्स्प्रेस ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथे येणाऱ्या अप मेल, एक्स्प्रेस कल्याण – ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : वडाळा रोड – मानखुर्ददरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत

परिणाम : ब्लॉक काळात वडाळा रोड – मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप मार्गावरील लोकल सेवा सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ दरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यानची लोकल सेवा सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५४ दरम्यान डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल – मानखुर्द – पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४.३० दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गिका / मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.