मुंबई : मोठा गाजावाजा करीत वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलेल्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. या मार्गिकेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. आता तर या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येतही मोठी घट झाली आहे. दुसऱ्या महिन्यात एकूण प्रवास संख्येत थेट ६८ हजार ८९६ ने घट झाली आहे, तर दैनंदिन प्रवासी संख्येत दुसऱ्या महिन्यात २९०३ ने घट झाली आहे.

ही मार्गिका सुरू झाल्यापासून दोन महिन्यांत एकूण १३ हजार ४८० फेऱ्या झाल्या. एकूण ११ लाख ९७ हजार ५२२ प्रवाशांनी भुयारी मेट्रो प्रवास केला. ही संख्या खूपच कमी असून मार्गिका सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात ६ लाख ३३ हजार २०९ प्रवाशांनी या मार्गिकेवरून प्रवास केला होता. दुसऱ्या महिन्यात ही संख्या केवळ ५ लाख ६४ हजार ३१३ इतकी आहे.

हेही वाचा – कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या सात

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे बांधकाम करीत आहे. या मार्गिकेतील १२.५ किमी लांबीचा आरे – बीकेसी टप्पा ७ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. या मार्गिकमुळे रेल्वे पोहोचत नसलेल्या परिसरात अतिवेगवान प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होत असल्याने या मार्गिकेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी एमएमआरसीसह सर्वांनाच अेपक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या मार्गिकेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

दिवसाला साडेचार लाख प्रवासी या मार्गिकेवरुन प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान या मार्गिकेवर दिवसाला सरासरी संख्या २१ हजार १०६ प्रवासी इतकी होती. दुसऱ्या महिन्यात अर्थात ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान दैनंदिन प्रवासी संख्येत घट झाली. या काळात मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी १८ हजार २०३ इतकी होती. या आकडेवारीवरून दुसऱ्या महिन्यात दैनंदिन प्रवासी संख्येत २९०३ ने घट झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळी जाण्यासाठी सुविधा नसल्याने तसेच पूर्ण मार्गिका वाहतूक सेवेत दाखल नसल्याने या मार्गिकेला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांनी रेल्वे, बेस्ट बस प्रवासाची सवय असून तोच पर्याय सुकर असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंबंधी एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.


बीकेसी आरे मेट्रोचे प्रवासी (कालावधी आणि संख्या)

७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर – ६ लाख ३३ हजार २०९

७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर – ५ लाख ६४ हजार ३१३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण घट – ६८ हजार ८९६