दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता

मुंबई : मुंबईत पहिल्या मात्रेचे लसीकरण १०० टक्के झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, शहरातील लसीकरण केंद्रांवर अद्याप पहिल्या मात्रेसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, दिवाळीनंतर लसीकरणाचा वेग वाढला असला तरी, शहरातील लाभार्थीची संख्या आणि दोन मात्रांतील अंतर कालावधी यांमुळे सर्व पात्र मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी किमान तीन महिने लागतील, असा अंदाज पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

कोविनच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील १८ वर्षांवरील सुमारे ९२ लाख ३६ हजार लोकसंख्येपैकी सर्वानी लशीची पहिली मात्रा पूर्ण केली आहे, तर यातील सुमारे ६१ लाख ४९ हजार नागरिकांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेचा कालावधी काही गटांसाठी कमी केल्यामुळे दुसऱ्या मात्रेच्या लाभार्थीची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता प्रतिदिन सरासरी ७० ते ८० हजार नागरिक दुसरी मात्रा घेत आहेत. परंतु अद्यापही ३१ लाख ३६ हजार नागरिकांची दुसरी मात्रा शिल्लक आहे.

मुंबईत १०० टक्के पहिल्या मात्रेचे लसीकरण झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी अजूनही नागरिक पहिली मात्रा घेत आहेत. पालिकेच्याच नोंदीनुसार सोमवारी सुमारे १८ हजार नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली. मंगळवारीही विविध लसीकरण केंद्रांवर पहिल्या मात्रेसाठी नागरिकांची रांग दिसून आली. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीदेखील पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पहिली मात्रा घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेर राहणाऱ्या नागरिकांचाही सहभाग असू शकतो, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. पालिकेच्या नोंदीनुसार पहिल्या मात्रेचे लसीकरण ९२ लाख ८५ हजारांवर गेले आहे. त्यामुळे मुंबईत लसीकरण वेगाने होत असले तरी लसीकरण पूर्ण होण्यास आणखी अवधी लागणार असल्याचे दिसून येते.

करोना प्रतिबंधासाठी लशीची एक मात्रा पुरेशी नाही हे आता विविध संशोधन अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे परिणामकारक प्रतिबंधात्मक शक्ती येण्यासाठी दोन्ही मात्रा पूर्ण होणे गरजेचे आहे. तेव्हा नागरिकांनी वेळेत दुसरी मात्रा घेणे आवश्यक आहे. जेणेकरून किमान संभाव्य तिसरी लाट येण्याआधी लसीकरण पूर्ण होईल आणि मृत्युदर वाढणार नाही.

– डॉ. अविनाश सुपे, मृत्यूविश्लेषण समितीचे प्रमुख

पहिल्या मात्रेमध्ये मुंबईबाहेरील १० टक्के नागरिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे लसीकरण आकडेवारीनुसार १०० टक्के झाले असले तरी पहिली मात्रा सुरूच ठेवणार आहोत. दुसऱ्या मात्रेचे लसीकरण वेगाने करण्यासाठीही पाठपुरावा केला जात आहे. परंतु मुंबईचे लसीकरण पूर्ण होण्यास आणखी तीन महिने लागतील. फेब्रुवारीपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

ठाणे जिल्ह्यात ५६ लाख नागरिकांना पहिली मात्रा

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लससाठा प्राप्त झाल्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढला आहे. नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात ५६ लाख ५१ हजार २८ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे. त्यापैकी ३१ लाख १२ हजार १६५ जणांची दुसरी मात्राही पूर्ण झाली आहे.  सध्या जिल्ह्यात दिवसाला ६० ते ७० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. काही गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे.