गोविंदा पथकांचा निर्णय; क्षमतेनुसारच थर रचणार

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करूनच यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय गोविंदा पथकांनी घेतला आहे. रविवारी परळ येथे झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.   गेल्या काही वर्षांत दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदाची वाढती संख्या लक्षात घेऊन गोविंदा पथकांनी गोविंदांचा विमा काढण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.

दहीहंडी उत्सवासंदर्भात रविवारी परळ येथील शिरोडकर विद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तीत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटीशर्तीचे काटेकोर पालन करूनच यंदाचा उत्सव साजरा करण्याच्या निर्णयावर पथकांचे एकमत झाले. दरम्यान, दहीहंडी उत्सवाचे देश-विदेशातील नागरिकांना दर्शन घडावे यासाठी मुंबईमध्ये लवकरच पाच ठिकाणी सराव साहसी खळाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

आयोजक दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित केल्या जणाऱ्या कार्यक्रमावर मोठी रक्कम खर्च करतात. त्याऐवजी जीवाची बाजी लाऊन उंच दहीहंडी थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी समन्वय समितीचे सचिव कमलेश भोईर यांनी यावेळी केले. तर गोविंदा पथकांनी गोविंदांचा विमा काढण्याचे आवाहन दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष बाला पडेलकर यांनी केले.

भाजपकडून एक लाख गोविंदांचा विमा

या बैठकीला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलारही उपस्थित होते. दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करता यावा अशी राज्य सरकारची भूमिका असून या उत्सवाचा त्रास कोणाला होणार नाही याची प्रत्येक गोविदाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी मुंबई भाजपतर्फे एक लाख गोविंदांचा विमा काढण्यात येईल, अशी घोषणाही शेलार यांनी यावेळी केली.