CM Eknath Shinde on building collapse in Bhiwandi : भिवंडीतील वळपाडा भागात शनिवारी (२९ एप्रिल) तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. याशिवाय सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “वर्धमान कंपाऊंडमध्ये ही दुर्घटना घडली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या इमारतीत सात ते आठ कुटुंबं राहत होती. इमारत पडल्यानंतर महापालिकेचं बचाव पथक, टीडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशामक दल, पोलीस यंत्रणा तात्काळ या ठिकाणी पोहचले. त्यांनी इमारतीखालून १२ लोकांना बाहेर काढलं. त्यातील सुदैवाने ९ लोक जीवंत बाहेर निघाली, दुर्दैवाने तीन लोकांचा मृत्यू झाला.”

“आणखी सात ते आठ लोकं इमारतीखाली असण्याची शक्यता”

“या इमारतीखाली आणखी सात ते आठ लोकं असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मदतकार्य सुरू आहे. इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत मी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आगामी पावसाळा लक्षात घेता अगदी केव्हाही पडू शकतील अशा धोकादायक इमारतींचं सर्व्हेक्षण करून त्या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना केल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

“धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हाच कायमस्वरुपीचा तोडगा”

“याशिवाय भिवंडी व इतर शहरांमध्ये पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती पडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेऊन धोकादायक इमारतींमधील लोकांना सुरक्षित हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हाच त्यावरील कायमस्वरुपीचा तोडगा आहे. म्हणून मी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना तातडीने क्लस्टरच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

हेही वाचा : भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘मृतांच्या नातलगांना पाच लाखांची मदत’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमारत मालक ताब्यात

इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम ठेकेदार कोण होते, याचाही शोध सुरू आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.