मुंबई : वर्सोवा ते दहिसर-भाईंदर सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्याकडून नुकतीच तत्वत: मान्यता प्राप्त झाल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला काही भागात सुरुवात झाली आहे. सागरी किनारा नियमन क्षेत्र वगळून उर्वरित भागात हे काम सुरू करण्यात आले आहे.
गोरेगाव येथे १.२ किमी लांबीच्या भागात मार्गाच्या पायाचे काम सुरू करण्यात आले असून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामाची नुकतीच पाहणी केली. सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) परवानगी अद्याप मिळाली नसल्यामुळे या भागात अद्याप काम सुरू करता येणार नाही.
वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेतर्फे उभारला जात आहे. हा मार्ग पुढे दहिसर – भाईंदर उन्नत मार्गालाही जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून थेट दहिसर – भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी पाहणी केली.
या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इत्यादी भागातील रहदारी कमी व प्रवास गतिशील होणार आहे. तसेच, प्रवास वेळ, इंधन खर्चात माेठी बचत होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनातही सुधारणा होणार आहे. त्यामुळे मुंबई किनारी मार्ग (उत्तर) या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पास वेग द्यावा, प्रकल्पाच्या कामात येणारे संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रकल्प पूर्ततेसाठी विविध शासकीय प्राधिकरण / मंडळे यांच्याकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश यावेळी बांगर यांनी दिले.
जेव्हीपीडीची वाहतूक कोंडीतून सुटका होणार
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्सोवा – वांद्रे सागरी सेतूचे (सी लिंक) काम सुरू आहे. याअंतर्गत डबल डेकर पूल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. बांगर यांनी वेसावे परिसरातील या प्रकल्पस्थळास भेट दिली. तसेच, एमएसआरडीसीच्या अभियंत्यांसमवेत संवाद साधला. उड्डाणपुलाचा उपमार्ग ज्या चौकात उतरतो त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेता उड्डाणपुलास अतिरिक्त उपमार्ग बांधल्यास जुहू – विलेपार्ले विकास (जेव्हीपीडी) येथील वाहतूक कोंडी समस्येपासून सुटका होऊ शकेल याचा विचार करावा.
उड्डाणपुलाचा उपमार्ग जेथे सुरू होतो, तेथे खालील बाजूला वाहनांना अडथळा येऊ नये यासाठी सुनियोजितपणे रस्ता रूंदीकरण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. या सुचनांची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश बांगर यांनी दिले.
त्यानंतर बांगर यांनी अंधेरी (पश्चिम) येथील अमरनाथ, बद्रीनाथ गृहनिर्माण संस्था मार्गे यारी रस्ता येथे सुरू असलेल्या पूल कामास भेट दिली. या पुलाचे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले आहेत. हा पूल किनारी रस्ता प्रकल्पास जोडला जाणार आहे. या ठिकाणच्या सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील काही बांधकामे प्रकल्पाने बाधित होत आहेत. ही सर्व बांधकामे अतिक्रमणे स्वरूपाची आहेत. अतिक्रमण निष्कासित केल्यास पुलाच्या कामास गती मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पाअंतर्गत खाडीच्या वर ११० मीटर स्पॅनचा ‘बास्केट’ पद्धतीचा पूल बांधण्यात येणार आहे. या परिसराची तसेच मत्स्य विज्ञान विद्यापीठ परिसराचीही बांगर यांनी पाहणी केली.