मुंबई : घराघरांत आनंद घेऊन येणारा प्रकाशोत्सव म्हणजेच दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील बाजारांत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली. वस्तू-सेवा कर कमी झाल्याने अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या असून ग्राहकांची मागणीही वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला असून मोठ्या प्रमाणावर वाहनखरेदीही करण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्याने सुवर्ण बाजारतही चैतन्य निर्माण झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या स्वागतासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या आहेत. फराळाचे जिन्नस, मिठाईने हलवायांची दुकाने सजली असून लाल-पिवळा गोंडा आणि निरनिराळ्या फुलांनी फुलबाजार सजले आहेत. त्याच वेळी निरनिराळ्या आकाराचे, रंगसंगतीचे आकाश कंदील बाजारपेठांच्या आकर्षणात भर घालत आहेत. त्यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या आहेत. सरकारने यंदा फक्त एसी आणि एलईडीवरील वस्तू सेवा करात (जीएसटी) कपात केली असली, तरी इलेक्ट्रॉनिकस उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्ट फोन, लॅपटॉप, धुलाई यंत्र, फ्रीज, स्वयंपाकघरातील उपकरणांमधील मायक्रोवेव्ह, मिक्सर-ग्रायंडर, एकर फ्रायर आदी वस्तूंनाही मागणी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

ऑनलाइन खरेदीतही मोठी वाढ

बाजारपेठांतील खरेदीसह ऑनलाइन खरेदीतही वाढ झाली आहे. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’, ‘फेस्टिव्हल ऑफ डिलाइट्स’ अशा सवलतींमुळे विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. स्मार्टफोनवर १५ ते ३० टक्क्यांपर्यंत सूट, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर झिरो-कॉस्ट ईएमआय, बँक सवलती आणि कॅशबॅक मिळत असल्याने ऑनलाइन विक्रीत २० ते २५ टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी ‘बाय वन, गेट वन’, कॅशबॅक आणि गिफ्ट व्हाउचर अशा योजनाही जाहीर केल्या आहेत. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील इलेक्ट्रॉनिक दुकाने ग्राहकांनी फुलली आहेत.

जीएसटीकपातीचा मर्यादित परिणाम

एसी आणि एलईडीवरील करकपात मर्यादित लाभ देणारी ठरली आहे. मात्र उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांकडून स्मार्ट एसी आणि हाय-एंड टीव्ही यांसारख्या वस्तूंना चांगली मागणी आहे. एकंदरीत दिवाळीपूर्व खरेदीने यंदा इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. जीएसटीकपात मर्यादित असली तरी, दुकानदारांच्या आकर्षक सवलती आणि ऑनलाइन सवलती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

घर विक्री तेजीत

दिवाळीच्या निमित्ताने घर विक्रीत वाढ झाली असून बांधकाम व्यवसायात उत्साहाचे वातावरण आहे. केवळ १८ दिवसांत मुंबईत ८,३५१ घरांची विक्री झाली असून या घर विक्रीतून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रूपात तब्बल ७५२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. चालू वर्षात मुंबईतील घर विक्री स्थिर असून जानेवारी – सप्टेंबर या कालावधीत घर विक्रीचे प्रमाण ११ हजार ते १५ हजार ५०० च्या दरम्यान राहिली. मार्चमध्ये सर्वाधिक १५ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती आणि यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रूपात १५८९ कोटी रुपये महसूल मिळाला होता. दरम्यान, सणासुदीच्या काळात घर खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल असतो. त्यामुळेच सणासुदीच्या काळात मुंबईतील घर विक्रीत नेहमीच वाढ होते. सप्टेंबरमध्ये मुंबईत १२ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती आणि यातून सरकारला १२९२ कोटी रुपपे महसूल मिळाला होता.

ऑक्टोबरमधील केवळ १८ दिवसांतच ८ हजार ३५१ घरांची विक्री झाली आहे. या घर विक्रीतून ७५२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. १८ दिवसांतील ही घर विक्री समाधानकारक मानली जात आहे. दिवाळीत घर खरेदी करणे, घराची नोंदणी करणे आणि गृहप्रवेश करण्याकडे कल असतो. घर खरेदीसह गृहप्रवेशासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या पाडव्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ऑक्टोबरच्या १८ दिवसांत घर विक्रीने ८ हजारांचा टप्पा पार केला आहे. यातून मालमत्ता बाजारपेठेतील तेजी अधोरेखित होत असून ऑक्टोबरमधील एकूण घर विक्रीची संख्या कितीचा टप्पा पार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोने, चांदी दरात घट, ग्राहकांमध्ये उत्साह

मुंबई : दीपोत्सवाचे आगमन समजल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी नागरिकांनी सोने-चांदी खरेदीला मोठी गर्दी केली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मागणी १० ते १५ टक्क्यांनी घटली आहे. मात्र मौल्यधातूंच्या किमती वाढल्याने एकंदर विक्री-मूल्यात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत काही दिवसांपासून सातत्याने नवीन उच्चांक करणाऱ्या सोने, चांदीच्या दरात धनत्रयोदशीला बऱ्यापैकी घसरण झाली. ग्राहकांनी त्यामुळे खरेदीसाठी गर्दी केल्याने सुवर्ण बाजारात चैतन्य निर्माण झाले.

देशात २२ सप्टेंबरपासून लागू केलेल्या ‘जीएसटी’ दर कपातीचा ग्राहकांना पूर्ण लाभ दिला जात आहे. केंद्र सरकार ५४ दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबरच ‘जीएसटी’ दर कपातीचे फायदे ग्राहकांना किमतीच्या स्वरुपात मिळत आहेत की नाही, यावरही पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी सांगितले. ‘जीएसटी बचत उत्सव’निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.