जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करणाऱ्या खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना परिवहन विभागाने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवकाळात जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन विभागाने या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत.

सणासुदीच्या दिवसांत मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बसेसही सोडण्यात येतात. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात; परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट के ली जाते. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने २०१८ मध्येच निश्चित के ले आहेत. तरीही खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारणी के ल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे ज्या ठिकाणाहून खासगी बसेस सुटतात, त्या ठिकाणापासूनचे किलोमीटरप्रमाणे भाडेदराचा तक्ता प्रसिद्ध करावा. तरीही अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. खासगी प्रवासी बसमधून प्रवास करताना अडचणी आल्यास त्याबाबत mvdcomplaint.enfs@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्याची सोयही के ली आहे.