मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिचे माजी सचिव प्रकाश जाजू यांच्याविरुद्ध २००८ मध्ये धमकावणे आणि विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. वाद परस्पर सामंजस्याने सोडवल्याचे आणि प्रकरण पुढे नेण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने जाजू यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.

प्रियंकाच्या तक्रारीवरून दाखल केलेला गुन्हा आणि पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी जाजू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी प्रियंका चोप्रा हिने दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून (व्हीडीओ कॉन्फरसिंग) न्यायालयासमोर उपस्थिती लावली. तसेच, जाजू यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्याला आपला आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

हेही वाचा – मुंबई : ४५ गुंतवणुकदारांची तब्बल १६ कोटी रुपयांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला गुन्हा

पक्षकारांनी त्यांच्यातील वाद परस्पर सामंजस्याने सोडवला आहे. त्यामुळे खटला प्रलंबित ठेवण्याने कोणताही हेतू साध्य होणार नाही, असे जाजू यांच्या वकिलातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर जाजू यांच्याविरोधात प्रियंका हिने केलेला गुन्हा न्यायालयाने रद्द केला. तसेच त्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची रक्कम पोलीस कल्याण निधीमध्ये दोन आठवड्यांत जमा करावी, असे आदेश जाजू यांना दिले.

जाजू यांनी केलेल्या याचिकेनुसार, जाजू हे २००१ ते २००४ या काळात प्रियंका हिचे सचिव म्हणून काम करत होते. सप्टेंबर २००७ मध्ये देय रकमेच्या थकबाकीवरून प्रियंका आणि जाजू यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांविरोधात अनेक प्रकरणे दाखल केली. दोघांनी त्यांच्यातील वाद मिटवल्याने ही प्रकरणे नंतर मागे घेतली गेली.

हेही वाचा – मुंबई : मुलुंड आणि ठाण्यातील नागरिकांना आजपासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा, पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन

प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑगस्ट २००८ मध्ये प्रियंका हिने जाजू यांच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये धमकावणे आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी जाजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला व आरोपपत्रही दाखल केले. प्रियंका हिने तक्रारीत, जाजू यांनी तिला आक्षेपार्ह आणि अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप केला होता. मात्र, प्रियंका हिच्यासोबतचे मतभेद सामंजस्याने सोडवले आहेत, त्यामुळे आपल्याविरोधातील गुन्हा कायम ठेवला तर तो न्यायालय आणि पोलिसांचा वेळेचा अपव्यय असेल. शिवाय प्रियंका हिला पाठवलेल्या संदेशामुळे तिला झालेल्या त्रासाबाबत आपण तिची विनाअट माफी मागितली आहे. तिच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा दावाही जाजू यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करताना केला होता.