भाजप आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचे फेसबुक खाते हॅक करून त्यावर नवनिर्वाचित मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी व इतर आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. भाजप आमदार राजहंस सिंह यांच्या स्वीय सहाय्यकाचे फेसबुक खाते हॅक करून हा प्रकार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

राजहंस सिंह यांचे स्वीय सहाय्यक दिनेश दहिवलकर यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी बदनामी करणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दहिवलकर जानेवारी २०२२ पासून आमदार राजहंस सिंह यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करीत आहेत. मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकताच माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. शेलार यांनी त्याबाबत एक पोस्ट फेसबुकवर अपलोड केली होती. त्यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री प्रकाश मेहता, आमदार पराग अळवणी, राजहंस सिंह, संजय उपाध्याय आधी उपस्थित होते, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. तक्रारदार दहिवलकर यांनी ती पोस्ट त्यांच्या फेसबुक खात्यावरून शेअर केली. त्यानंतर काही वेळात त्यांना आमदार राजहंस सिंह यांचा दूरध्वनी आला.

त्यावेळी सिंह यांनी दहिवलकर यांच्या फेसबुकवरून सर्वांबद्दल बदनामीकारक पोस्ट शेअर करण्यात आल्याचे सांगितले. दहिवलकर यांनी तपासणी केली असता त्यांच्या फेसबुक खात्यावरून सर्वांबद्दल बदनामीकारक पोस्ट शेअर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपले फेसबुक खाते हॅक झाल्याचे दहिवलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ याप्रकरणी कुरार पोलिसांकडे तक्रार केली. त्याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपीने शेअर केलेली पोस्ट काही वेळाने डिलीट केली. दहिवलकर यांनी पोस्टचे छायाचित्र पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर केले आहे. त्याच्या साहाय्याने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.