भारतीय जनता पार्टीच्यावतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाला फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मनसेच्या दिपोत्सवाला हजेरी लावल्यानंतर फडणवीस यांनी भाजपाच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तिथे मुंबई महानगरपालिकेमध्ये भगवा फडवण्याचा विश्वास व्यक्त केल्याने युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

नक्की वाचा >> “खरंच युती झाली असेल तर…”; CM शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंचा उल्लेख करत मनसेच्या दिपोत्सवानंतर राष्ट्रवादीची मागणी

बोरिवलीचे आमदार सुनील राणे, चारकोपचे आमदार योगेश सागर, दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी तसेच आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितत पार पडलेल्या या कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना फडणवीस यांनी पुढील वर्षी हा उत्सव होत असेल तेव्हा मुंबईमध्ये भाजपाची सत्ता असेल असा विश्वास व्यक्त केला. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर केला. फडणवीस यांनी सर्व उपस्थित भाजपा समर्थकांना लोकांची मनं जिंकली की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकता येईल असं सांगितलं.

“पुढच्या वर्षी दिवाळीचा कार्यक्रम आपण करत असू त्यावेळी महाराष्ट्र सरकारबरोबरच मुंबईतही सरकार आपलेच असेल. आपण हाच संकल्प करुयात,” असं आवाहन फडणवीस यांनी केलं. तसेच, “जनतेची मनं जिंकूयात. जनतेची मनं जिंकली की मतं जिंकता येतात. आणि मतं जिंकली की निश्चितपणे आपला भगवा आपण महानगरपालिकेवर फडकवून दाखवू,” असं फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कालच सायंकाळी फडणवीस हे दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या दिपोत्सवाला हजर होते. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केलं नाही. मात्र पहिल्यांदाच तिन्ही नेत्यांना एकाच मंचावर पाहून तसेच शिवाजी पार्क परिसरात लावलेले बॅनर आणि होर्डींगवर तिन्ही नेत्यांचे झळकलेले फोटो हे भविष्यातील युतीसंदर्भात सूचक इशारा करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.