खलिस्तानबाबत संपादकीय प्रसारित केल्याच्या कारणावरून डिजिटल वृत्तवाहिनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून व्यवस्थापकीय संपादकांना धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वृत्तवाहिनीने केलेल्या तक्रारीवरून अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिजिटल वृत्तवाहिनी व संकेतस्थळ असलेल्या या वाहिनीच्या उपाध्यक्षांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती.
हेही वाचा >>> संगीत शिक्षकाला बेकायदेशीरीत्या ताब्यात घेणे महागात पडले; दोन लाखांच्या भरपाईचे पोलिसांना आदेश




तक्रारीनुसार, त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांनी बुधवारी ‘खलिस्तान’ या विषयावर संपादकीय प्रसारित केले होते. त्याच संध्याकाळी, वाहिनीच्या कार्यालयात गुरिंदर नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी केला. पंजाबमधील चंदिगड येथून बोलत असून आपल्याला वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादकाशी बोलायचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र व्यवस्थापकीय संपादक कार्यालयात नसल्याचे गुरिंदरला सांगण्यात आले. त्यावेळी त्याने संपादकीय बंद करा, हा इशारा म्हणून घ्या, अशी धमकी दिली. त्यानंतर वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुरिंदरविरुद्ध भादंवि कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सलोखा राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे), ५०६ – २ (गुन्हेगारी धमकी), आणि ५०७ (संभाषण साधनावरून निनावी धमकी) गुन्हा दाखल केला आहे.