मुंबई : लक्ष्मीपूजनानिमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. मुंबईतील हवा बिघडली असून, मंगळवारी मुंबईची हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली. मुंबईचा हवा निर्देशांक २११ इतका होता. मुंबई शहरासह उपनगरांमध्येही वातावरणावर फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘समीर’ ॲपवर नोंदविले आहे.

समीर ॲपच्या माध्यमातून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईची हवा गुणवत्ता ‘मध्यम’ ते ‘वाईट’ या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात आणखी बदल होऊन हवा गुणवत्ता ‘वाईट’ ते ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच फटाके फोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी ६ नंतर पुन्हा फटाके फोडण्यास सुरुवात झाली. सुतळी बॉम्ब, पाऊस, आकाशात फुटणारे रंगीबेरंगी फटाके यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.

दरम्यान, मुंबईसह, नवी मुंबई, तसेच ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. साधारण पाऊस पडला की प्रदुषके पावसासोबत वाहून जातात. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होते. असे समीकरण असले तरी मंगळवारी सकाळपासून शहर, तसेच उपनगरांत फटाके फोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी हलक्या सरी जरी बरसल्या, तरी नागरिकांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह कायम होता.

पावसाबरोबर सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याबरोबर काही ठिकाणी धुळीचे लोट पसरले होते. दरम्यान, समीर ॲपच्या नोंदीनुसार मंगळवारी माझगाव येथे हवेचा निर्देशांक ३०२, वांद्रे कुर्ला संकुल ३७७ आणि नेव्ही नगर कुलाबा येथे ३४० इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत नोंदली गेली. त्याखालोखाल मुलुंड येथे २०५, मालाड २८२, कांदिवली २०५, देवनार २७१, चेंबूर २५१, चकाला अंधेरी २४९, भायखळा २७४, पवई २२८, शिवाजी नगर २१३, वरळी २७४ आणि बोरिवली येथे २३२ इतका होता. म्हणजेच येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा खालावली होती.

आजारांना निमंत्रण

हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका होऊ शकतो. करोना आटोक्यात आला असला तरी पावसाळ्यापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकल्याचा त्रास वाढण्याची भीती आहे.

काय झाले?

पावसामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कण वाहून नेल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र पावसाळा सरल्यानंतर काही दिवसांतच दिवाळीनिमित्त करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरण धूर पसरला आहे. याचबरोबर मुंबईत मंगळवारी सकाळपासून फटाके फोडण्याचे प्रमाण अधिक होते.

काळजीसाठी काय?

हवेची गुणवत्ता सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे असे प्रकार होऊ शकतात. तर हवेची गुणवत्ता ‘वाईट’ पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते. त्यामुळे सध्या घराबाहेर मुखपट्टीचा वापर आवश्यक करावा.