मुंबई : म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवन मुख्यालयात कार्यरत असलेल्या १६४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना म्हाडाने अनोखी दिवाळी भेट दिली आहे. या १६४ अधिकारी-कर्मचार्यांना घाटकोपर, मुंबई सेंट्रल आणि शीव प्रतीक्षानगर येथील सेवानिवासस्थानांचे दिवाळीच्या मुहूर्तावर वितरण करण्यात आले. आता म्हाडातील सेवा निवासस्थानाची प्रतीक्षा यादी शून्यावर पोहोचली आहे.

परवडणाऱ्या घरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हक्काचा निवारा देणाऱ्या म्हाडाच्या मुंबईतील म्हाडा भवनात मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या अधिकारी-कर्मचार्यांपैकी अनेकांच्या हक्काच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सेवेत रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचार्यांना मुंबईतील घरांच्या किंमती लक्षात घेता तात्काळ हक्काचे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना एक तर भाड्याच्या घराचा वा सेवा निवासस्थानांचा पर्याय निवडावा लागतो. असे असताना मुंबईत सेवा निवासस्थान मिळविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. अपुऱ्या सेवा निवासस्थानामुळे काही अधिकारी-कर्मचारी वसई-विरार, कल्याण, टीटवाळा आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा येण्या-जाण्यात बराच वेळ जातो.

२०२२ मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीतील कर्मचाऱ्यांची भर पडल्याने म्हाडाची सेवानिवासस्थानांची प्रतीक्षा यादी ३८७ वर गेली होती. ही बाब लक्षात घेता म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी टप्प्याटप्प्याने सेवा निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली असून दोन दिवसांपूर्वी १६४ सेवा निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आता प्रतीक्षा यादी शून्यावर पोहोचली आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवारा मिळाला असून त्यांच्यासाठी ही दिवाळी भेट ठरली आहे.

घाटकोपर येथील ८० सेवा निवासस्थाने, मुंबई सेंट्रलमधील ५७ आणि शीव प्रतीक्षा नगरमधील २७ अशा एकूण १६४ सेवा निवासस्थानांचे वितरण नुकतेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.