मुंबई: दिवाळीनिमत्त महसूल विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

याविषयीचे राजपत्र काढण्यात आले असून या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी करू शकणार आहेत. ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. आता मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

मालमत्ता किंवा करार कोणत्याही भागातील असला तरी कोणत्याही कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार असल्याने मुंबईकरांच्या वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. शिवाय धावपळही वाचणार आहे. सोबतच निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज देखील जलदगतीने होणार आहे.