मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहे. रेल्वे स्थानकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. प्रवास करा, मात्र स्थानकात कोणीही थांबू नका, अशा उद्घोषणा सतत करण्यात येत आहेत. आंदोलकांनी मात्र मुंबई सोडून जाणार नाही, असा निर्धार केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्याच्या विविध भागातून शुक्रवारपासून आलेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मुक्काम केला आहे. तेथून आंदोलकांना बाहेर काढण्याची मोठे कसोटी रेल्वे पोलिसांपुढे आहे. प्रवास करा, मात्र स्थानकात थांबू नका, परिसर खाली करा अशा स्वरूपाचे आवाहन पोलीस ध्वनीक्षेपकावरून करीत आहेत. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या जवानांना संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरामध्ये तैनात करण्यात आले आहे.

बळाचा वापर करणार नाही – पोलीस

आम्ही आंदोलकांना विनंती करीत आहोत, कुठल्याही प्रकारच्या बळाचा वापर केला जाणार नाही. आमच्या कोणाच्याही हातात लाठ्या नाहीत, असे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कटारे यांनी सांगितले. काही वेळ विश्रांतीसाठी बसण्यासाठी मुभा दिली आहे, असेही ते म्हणाले. मात्र हा परिसर आम्ही मोकळा करू असेही ते म्हणाले.

आंदोलकांचा ओघ सुरूच

उच्च न्यायालयाने आझाद मैदान परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले असले तरीही आंदोलकांचा मुंबईकडे येण्याचा ओघ सुरूच आहे. रेल्वे स्थानकातून आंदोलक मोठ्या संख्येने परिसरात दाखल होत आहेत. आम्हाला परिसर खाली करण्यास सांगितले आहे. मात्र आम्ही मुंबई सोडून जाणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. ही मुंबई आमची आहे, मराठी माणसाची आहे. आम्हाला स्थानक परिसरातून काढतील. आम्ही अन्यत्र कुठेही राहू, पण मुंबई सोडणार नाही, असेही एका आंदोलकांनी सांगितले.