मुंबई : दिल्लीवरून केरळच्या दिशेने जाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमध्ये ३६ कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ सापडले. याप्रकरणी यात नायजेरियन महिला एतुमुदोन डोरिस या महिलेला अटक करण्यात आली. मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बल (आयपीएफ), अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी), बंगळुरू व गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून नायजेरियन महिला प्रवास करीत होती. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी), बंगळुरू यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) पनवेल येथील आरपीएफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. यात पनवेल आरपीएफ निरीक्षक अंजनी बाबर, पनवेल आरपीएफ सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद सिंह, एनसीबी बंगळुरूचे गुप्तचर अधिकारी मुरारी लाल आणि मधुसूदन विश्वकर्मा, पनवेल गुप्तचर शाखेचे निरीक्षक सतीश कुमार यादव, कुर्ला गुप्तचर शाखेचे उपनिरीक्षक नवीन सिंह, प्रल्हाद पाटील, ज्योती कुशवाह, धिरेंद्र यादव यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले.

शोध मोहीम कशी सुरू केली

मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस शुक्रवारी पनवेल रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वर आली असता पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान ए – २ डब्यातील आसन क्रमांक २७ वर लहान मुलगा आणि बॅगासह एक नायजेरियन महिला आढळली. यावेळी नायजेरियन महिलेने स्वतःचे नाव एतुमुदोन डोरिस असल्याचे सांगून नायजेरियन पासपोर्ट दाखविला. तसेच एतुमुदोन डोरिससोबत तिचा मुलगा मिरॅकल होता. तसेच तिने अमली पदार्थ बाळगल्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅगेतअमली पदार्थ सापडले

पनवेल येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महिलेला पोलीस चौकीत आणून तिच्या बॅगेची कसून तपासणी केली. यावेळी, ड्रग डिटेक्शन किटचा वापर करून एका बॅगची तपासणी केली असता त्यात कोकेन असल्याचे आढळून आले. एकूण २.००२ किलो कोकेन जप्त करण्यात आले. तर, मुलाच्या बॅगमध्ये दोन कागदात गुंडाळलेले १.४८८ किलो मेथॅम्फेटामाइन आढळले.