मुंबई : ई-कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊर्जा’ या विशेष उपक्रमांतर्गत ई-कचरा व्यवस्थापन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. करी रोड परिसरातील ना. म. जोशी शाळेत १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

यावेळी महानगरपालिकेचे उप आयुक्त किरण दिघावकर, महानगरपालिका उप आयुक्त प्राची जांभेकर, प्रमुख अभियंता विनायक भट, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई आदी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी ई-कचऱ्यावर आधारित विविध प्रकल्प, वस्तू आणि उपक्रम सादर करतील.

ई-कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि व्यवस्थापन या संकल्पनांवर आधारित हे प्रकल्प नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यास आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यास प्रोत्साहित करतील.

गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रोफाइन रिसायकलिंग प्रा. लि. ई-कचऱ्याचे सुरक्षित व शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करीत आहेत. आतापर्यंत १५ हजार टन कचऱ्याचे पुनर्वापर करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.