मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल) बँक फसवणूक प्रकरणात सुमारे १८५ कोटी ८४ लाख रुपयांच्या मालमत्त्तेवर टाच आणली आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत मुंबईतील १५४ सदनिका तसेच इतर २० सदनिकांबाबत वसुली हक्कांचा समावेश आहे.
या प्रकरणात डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान, धीरज वाधवान आणि इतर आरोपींवर युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समूहाला फसवण्याचा आरोप आहे. या अनुषंगाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता.
तपासात असे उघड झाले की वाधवान बंधूंनी व डीएचएफएलच्या बँक कर्जाची रक्कम हस्तांरित केली व कर्जफेड केली नाही. तसेच २०१७–१८ दरम्यान, कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी बनावट कंपन्यांमार्फत व इंटर-कॉर्पोरेट डिपॉझिट्सच्या (आयसीडी) माध्यमातून डीएचएफएलचे निधी वळवून शेअर बाजारात बनावट व्यवहार केले. दलालांमार्फत डीएचएफएलच्या समभागांचे दर व व्यवहारांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही ईडीने याप्रकरणी ७० कोटी ३९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. तसेच ३ एप्रिल रोजी विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने २ मे रोजी त्याची दखल घेतली होती.
आतापर्यंत या प्रकरणातील जप्त मालमत्तेची एकूण रक्कम २५६ कोटींवर पोहोचली आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.