मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सहा पुनर्वसित इमारतींच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी पुनर्वसन प्रकल्पात माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील २३ वर्षीय जवान मुरली नाईक शहीद झाले. मुरली नाईक हे कामराज नगरमधील रहिवाशी होते. तेव्हा मुरली नाईक यांच्या कुटुंबाला या पुनर्वसन प्रकल्पात मोफत एक व्यावसायिक गाळा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

पूर्वमूक्त मार्ग विस्तारीकरणाअतंर्गत एमएमआरडीएने रमाबाई नगर आणि कामराजनगरमधील ३१.८५ हेक्टर जागेवरील सरसकट झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि एमएमआरडीएच्या संयुक्त भागीदारीतून पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. भूमिपूजनानंतर तात्काळ बुधवारपासूनच पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

बुधवारपासूनच प्रकल्पस्थळी यंत्रसामग्री दाखल करून कंत्राटदार बी. जी. शिर्के समुहाकडून कामाला सुरुवात केली जाणार आहे. निविदेनुसार पहिल्या टप्प्यात १२९९ कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात ४३४५ घरे बांधण्यात येणार आहेत. २२ मजली सहा पुनर्वसित इमारतीत ही घरे असणार असून प्रत्येक इमारतीत दोन विंग्ज असणार आहे. तर प्रत्येक मजल्यावर ३०० चौ. फुटाची ३२ घरे असणार आहेत. एक बीएचकेची ही घरे असणार असून घरांचे, इमारतींच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बांधकामाचा दर्जा उत्तम असेल, असा दावा यावेळी एमएमआरडीएकडून करण्यात आला. बगीचे, मनोरंजन मैदान, अंगणवाडी, स्वास्थ केंद्र, समाज मंदिर, व्यायामशाळा, युवा केंद्र, सोसायटी कार्यालय आदी सुविधा या प्रकल्पात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाल्यापासून ३६ महिन्यांचा कालावधी कामाच्या पूर्णत्वासाठी कंत्राटदारास देण्यात आला आहे. मात्र त्याआधीच केवळ २४ महिन्यांत काम पूर्ण करून रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी एमएमआरडीएला दिले आहेत. आता हे आव्हान कंत्राटदार आणि एमएमआरडीए कसे पेलणार, दोन वर्षांत प्रकल्प कसा मार्गी लावणार याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल. दरम्यान, या प्रकल्पात माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक बांधण्यात येईल, अशी घोषणा यावेळी शिंदे यांनी केली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडेही घातले.

त्यामुळे आता या प्रकल्पात रमाबाईंचे स्मारक होणार आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. रमाबाईंच्या स्मारकाबरोबरच कामराज नगरमधील शहीद मुरली नाईक याच्या कुटुंबाला एक व्यापारी गाळा मोफत देण्याचीही घोषणा करण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे आल्यानंतर त्याला मान्यता देऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती यावेळी एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.