मुंबई : मुंबई आणि परिसरात तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना वाढत आहे. मागील दोन महिन्यांत तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या आठ घटना घडल्या. भामटे ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यात गाठून पोलीस असल्याची बतावणी करतात आणि त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज काढून घेतात. या तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पोलीस असल्याची बतावाणी करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून हे प्रकार वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. एकीकडे सायबर भामटे पोलीस असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठांची लाखो रुपयांची फसवणूक करीत आहेत. तर दुसरीकडे भामटे पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठांची फसवणूक करीत आहेत. ‘पुढे खून झाला आहे’, ‘दरोडा पडला आहे’, ‘शेठला मुलगा झाला असून तो साड्या वाटत आहे’, असे सांगून ज्येष्ठांची दिशाभूल करून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले जातात.

तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या ८ घटना

जून आणि जुलै महिन्यांत तोतया पोलिसांकडून रस्त्यात ज्येष्ठांची फसवणूक केल्याच्या ८ घटना घडल्या आहेत. यातील काही प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र तोतया पोलिसांकडून होणारी फसणूक पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरले आहे.

पोलिसांबद्दल भीती असल्याचे परिणाम

ब्रिटिशांच्या काळापासून पोलिसांना अनेक अधिकार मिळाले आहेत. रस्त्यात गाठून कुणाचीही चौकशी कऱण्याचे पोलिसांना अधिकार असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. पोलिसांची एवढी भीती असते की त्यांच्याशी वाद घालून त्यांना प्रत्यूत्तर करण्याची सर्वसामान्यांची फारशी मानसिकता नसते. पोलीस सांगत असतील म्हणजे ते खरेच असावे असा जुन्या लोकांचा समज असतो. त्यामुळे ज्येष्ठांना रस्त्यात थांबवून फसविण्यासाठी शासकीय अधिकारी, बॅंकर, पत्रकार, शिक्षक आदींऐवजी पोलीस असल्याची बतावणी केली जाते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

५० वर्षांपूर्वींची पद्धत आजही लागू

१९६०-७० च्या दशकात माहिती तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. बहुसंख्य कुटुंबियांकडे दूरचित्रवाणी संचही नव्हते. अशा काळात भामटे पोलीस असल्याची बतावणी करून गुन्हे करीत होते. त्या काळातील गुन्हे कथा, कादंबऱ्यांमध्ये हाच विषय आढळतो. स्मार्ट फोन, विविध प्रभावी समाजमाध्यमे असली तरी गुन्ह्याची जुनीच पध्दत आजही तेवढीच परिणामकारक आहे, असे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी अनोळखी व्यक्ती पोलीस असल्याचा दावा करीत असेल तर त्याचे ओळखपत्र तपासावे किंवा संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तोतया पोलिसांपासून सावध रहावे यासाठी आम्ही जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पश्चिम उपनगरातील पोलीस उपायुक्तांनी दिली.

तोतया पोलिसांकडून फसवणुकीचा काही घटना

जून २०२५

मालाडमध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला दोन नकली पोलिसांनी बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्याकडील २ लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या.

मे २०२५

अंधेरी येथे दोन भामट्यांनी पोलीस असल्याचे सांगून ७१ वर्षीय वृध्दाला रस्त्यात बोलण्यात गुंतवून, भीती घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील कडे असा ६६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.