लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : धारावी परिसरात ९० फूट मार्गावरील सात मजली शमा इमारतीला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये ३३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
शमा इमारतीच्या पाचव्या मजल्यार सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इमारतीमध्ये धुराचे लोट पसरू लागल्याने इमारतीमधील नागरिकांनी तळमजल्याकडे धाव घेतली. तर, काही कुटुंबे इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अडकून पडली. आगीच्या घटनेची माहिती रहिवाशांकडून तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक तरुणांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनेच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. आगीची पातळी ही पहिल्या स्तराची असल्याने अवघ्या काही वेळातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी १२.३० वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
आगीमध्ये निर्माण झालेल्या धुराच्या लोटाचा काही जणांना त्रास झाला तर, काही जण भाजल्याने त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आगीत जखमी झालेल्या ३३ जणांना लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
जखमींची नावे निदा शेख (३०), सय्यद सलमाऊदीन ( ६७), सय्यद हिना ( २६), आयशा शेख ( १६), तौसिफ (३५), रेहान शेख ( एक महिने), नादिया शेख (५ वर्षे), मुस्कान शेख (३५), फरहान शेख (१०), सना दळवी (२७), रेहान मस्तान (१७), नेहार शेख (११), कैफ शेख (८ ), मस्तान शेख (३५), खाउनिसा (६०), रुखसाना शेख (२६), आयन मस्तान शेख ( १५), निदा शेख (३०), सय्यद सलमाऊदीन ( ६७), सय्यद हिना ( २६), नामिरा सय्यद ( १९), सानिया शेख (११), अफरान शेख ( ७), चांद शेख ( ४०), मस्तान शेख (३५), खाउनिसा ( ६०), रुखसाना शेख (२६), आयन मस्तान शेख ( १५).