मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शनिवारी गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर केडिया यांची एक चित्रफीत पसरली होती. त्यात त्यांनी मुंबईत ३० वर्षे राहूनही ते मराठी बोलू शकत नाहीत आणि त्यांनी मनसेला खुली आव्हान दिली होते.
त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सेन्च्युरी बाजार येथील व्ही वर्क येथील केडीया यांच्या कार्यालयातील काचेच्या दरावर नारळ फेकले. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर केडिया यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले.
शनिवारी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सेंच्युरी बाजार येथील व्ही वर्क कार्यालयाच्या काचांवर नारळ फेकत तोडफोड केली. कार्यकर्ते ‘मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा घोषणा देत होते आणि राज ठाकरे यांचा जयजयकार करत होते. सुरक्षा रक्षकांना ही तोडफोड थांबवण्यात अपयश आले.
याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले आहेत. केडिया यांच्या विधानाने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत केडिया यांना ‘मराठीचा अपमान करू नका, अन्यथा चपराक मिळेल’ असा इशारा दिला होता.
राज ठाकरे यांची माफी मागितली
कार्यालयातील तोडफोडीची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर सुशील केडिया यांनी शनिवारी ४ मिनिटांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आपल्या विधानाबद्दल माफी मागितली. माझे ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत, तणावात आणि दडपणाखाली झाले. आता ते ट्विट काही लोकांकडून त्यांच्या फायद्यासाठी चुकीच्या अर्थाने वापरले जात आहे. मराठी न येणाऱ्या लोकांवर होणाऱ्या हिंसाचारामुळे मानसिक तणावाखाली माझी प्रतिक्रिया तीव्र झाली आणि मी अपेक्षेपेक्ष अधिक प्रतिक्रिया नोंदवली. याची मला जाणीव झाली आणि मी ते विधान मागे घेतो, अशा शब्दात त्यांनी माघार घेतली.
ते पुढे म्हणाले, इतकी वर्षे मुंबईत राहूनसुद्धा एका मूळ मराठी व्यक्तीइतकी भाषेची प्रावीण्यता आणि सफाई आम्हाला येत नाही. त्यामुळे चुकीचा उच्चार झाला तर गैरसमज होऊ शकतो या भितीमुळे मराठी वापर फक्त अत्यंत अनौपचारिक आणि जवळच्या लोकांमध्येच केला जातो. भारतातील सात भाषांमध्ये मी सहज संवाद साधतो पण मराठी बाबतीत जेव्हा वातावरणात भीती असते की एक शब्द चुकला तर त्याचा विपर्यास होऊ शकतो, तेव्हा तीव्र अस्वस्थता जाणवते.
भावनिक प्रतिक्रिया, घाईतून आणि तणावाखाली केलेलं ट्विट
केडिया पुढे म्हणाले, “मी राज ठाकरे यांच्या भूमिकांचा आदर करत आलो आहे. त्यांनी अनेकदा ज्वलंत मुद्दे मांडले आहेत. माझे ट्विट भावनिक प्रतिक्रिया होती, घाईत आणि तणावात देण्यात आली होती. माझ्या पूर्वीच्या ट्वीट्स बघितल्यास, मी राज ठाकरे यांच्याबद्दल कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे.