मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात, २०२४ – २५ मध्ये देशात विक्रमी १६४७.०५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा पहिला अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केला आहे. प्रामुख्याने तांदूळ, मका आणि भुईमुगाच्या उत्पादनात उच्चांकी वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्यांचे एकूण उत्पादन सुमारे १६४७.०५ लाख टनांवर जाईल. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ८९.३७ लाख टनांनी आणि खरीप उत्पादनाच्या सरासरीच्या १२४.५९ लाख टनांनी जास्त असेल, असा पहिला अगाऊ अंदाज आहे. तांदूळ, मका, ज्वारी आणि भुईमुगाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या खरिपात तांदूळ उत्पादन उच्चांकी ११९९.३४ लाख टन होईल, मागील वर्षापेक्षा ६६.७५ लाख टनांनी जास्त असेल. तर खरीप तांदूळ उत्पादनाच्या सरासरीपेक्षा ११४.८३ लाख टनांनी जास्त असेल. मका उत्पादन २४५.४१ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. तर पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) उत्पादन ३७८.१८ लाख टन होण्याचा अंदाज आहे. डाळींचे उत्पादन ६९.५४ लाख टन आणि तेलबियांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत १५.८३ लाख टनांनी वाढून २५७.४५ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. भुईमुगाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज असून, १०३.६० लाख टन भुईमूग आणि १३३.६० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे. देशात ४३९९.३० लाख टन उसाचे, २९९.६ लाख गाठी (एक गाठ – १७० किलो) कापसाचे, ज्युट आणि तागाच्या ८४.५६ लाख गाठींचे (एक गाठ – १८० किलो) उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

यंदा प्रथमच डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या  (डीसीएस) मदतीने खरीप पिकांची माहिती संकलित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि ओदिशा पाच राज्यांतील पिकांची सर्व माहिती डीसीएसच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे.

खरीप हंगामातील अन्नधान्य उत्पादन (लाख टन)

एकूण अन्नधान्य उत्पादन – १६४७.०५ (विक्रमी)

तांदूळ – ११९९.३४ (विक्रमी)

मका – २४५.४१ (विक्रमी)

तृणधान्य (श्री अन्न) – ३७८.१८

डाळी (तूर, उडीद, मूग) – ६९.५४

तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) – २५७.४५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कापूस – २९९.२६ लाख गाठी