मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभाग व महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी दोन मोठ्या कारवाया करून २३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यातील पहिल्या कारवाईत थायलंडहून तस्करी करून आणलेला सुमारे १२ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे.
या गांजाची बेकायदेशीर बाजारातील किंमत सुमारे १२ कोटी रुपये असून या प्रकरणी दोन भारतीय प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. याशिवाय डीआरआयने केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ६७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत ११ कोटी ३९ लाख रुपये आहे. आणखी एका कारवाईत सव्वा चार कोटी रुपयांच्या सोन्यासह दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत, बँकॉकहून काही संशयीत व्यक्ती मोठ्याप्रमाणात गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (२१ जून) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांना अडवले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत व्हॅक्यूम सील पद्धतीने काही संशयीस्पद पदार्थ लपवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हिरव्या रंगाच्या या पदार्थांची तपासणी केली असता ते हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रवशांकडून ११ किलो ८८१ ग्रॅम वजनाचा हाड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ११ कोटी ८८ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपींनी उश्यांच्या अभ्य्रात गांजा लपवला होता. व्हॅक्यूम सीलद्वारे कमी जागेत अधिक गांजा लपवण्यात आला होता. पण सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत दोन्ही प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय सीमाशुल्क विभागाला असून त्याबाबत तपास सुरू आहे.
पोटातून कोकेनच्या कॅप्सुल
देशात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आयव्हरी कोस्ट देशाच्या नागरिकाबाबत गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने १९ जूनला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते. तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता. प्राथमिक चौकशीत संबंधित प्रवाशाने भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या उद्देशाने काही कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांत त्याने एकूण ६७ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. त्यात ११३० ग्रॅम कोकेन सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ११ लाख ३९ हजार रुपये आहे. आरोपी परदेशी नागरिकाला अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सव्वाचार कोटींच्या सोन्यासह कर्मचाऱ्यांना अटक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्त कक्षाच्या (एआययू) अथिकाऱ्यांनी रविवारी विमानतळावर कार्यरत दोन कर्मचाऱ्यांना अडवले. वैयक्तिक झडती दरम्यान त्यांच्या खिशात ठेवलेल्या मोज्यांमध्ये मेणबत्ती लपवलेली असल्याचे आढळली. त्यातील मेण वितळवले असता आत २४ कॅरेट सोन्याची भुकटी सापडली. आरोपींकडून एकूण चार किलो ४४० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सव्वाचार कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दोघांविरोधात सीमाशुल्क कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.