मुंबई : हिंदुजा फाउंडेशन आणि डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराच्या माध्यमातून शिर्डी तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातील वंचित महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात सुमारे १० हजार माहिलांचे गर्भाशय मुख व स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तपासणीत ज्यांना कर्करोग आढळून येईल त्यांच्यावर माने मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत उपचारही करण्यात येणार आहेत.

ग्रामीण महाराष्ट्रातील वंचित महिलांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने हिंदुजा फाउंडेशन व अहमदनगरस्थित डॉ. माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून शिर्डीमध्ये तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५पर्यंत १० हजार गरीब महिलांची गर्भाशय मुख (सर्व्हायकल) व स्तन कर्करोगासाठी तपासणी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत पहिले तपासणी शिबीर ८ जून रोजी शिर्डीजवळील राहुरी येथे पार पडला असून सुमारे ३५० महिलांची तपासणी करण्यात आली.

कर्करोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचार हे उद्दिष्ट या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. वंचित समुदायांना आर्थिक अडचणी व भौगोलिक मर्यादांमुळे अशा तपासण्या करून घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून ही तफावत भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्याकडे असून महिलांची ‘पॅप स्मीअर’ तपासणी व ‘क्लिनिकल ब्रेस्ट एग्झॅमिनेशन’ केली जाईल. गरज असल्यास, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल यांच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाबद्दल बोलताना ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या सूकाणू समितीच्या सदस्या नम्रता हिंदुजा म्हणाल्या, महिलांना आरोग्याच्या माध्यमातून सशक्त करणे हे बळकट समाजनिर्मितीचे मूलभूत पाऊल आहे. आरोग्यसेवेत असलेली तफावत भरून काढणे आणि कोणतीही स्त्री केवळ तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे, ही आमची बांधिलकी आहे. ‘हिंदुजा फाउंडेशन’चे अध्यक्ष पॉल अब्राहम म्हणाले, “भारतात कर्करोगाचे वेगाने वाढणारे प्रमाण ही मोठीच चिंतेची बाब आहे. २०२५मध्ये देशात कर्करोगाचे १७ लाखांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले गेले असून, २०३०पर्यंत ही संख्या २५ लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. तपासणीच्या माध्यमातून लवकर निदान झाल्यास उपचाराचा खर्च कमी ठेवता येतो आणि बरे होण्याची शक्यता वाढते. आमचा हा उपक्रम केवळ रोगाचे निदान व उपचार यांपुरता मर्यादित नसून, तो जनजागृती, सशक्तीकरण व प्रतिबंधात्मक आरोग्य संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. आम्ही अशा वंचित समुदायांमध्ये दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शिबिरामध्ये ज्या महिलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळतील, त्यांना राहुरी येथील ‘डॉ. माने चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये मोफत उपचार दिले जातील. याचबरोबर, स्थानिक आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून आरोग्यव्यवस्थेची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे.‘रिलायन्स लाईफ इन्शुरन्स’च्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम सध्या शिर्डीमध्ये राबवला जात आहे. लवकरच उस्मानाबाद आणि अहिल्यानगर या कर्करोगाच्या दृष्टीने संवेदनशील जिल्ह्यांमध्येही हा उपक्रमराबविण्यात येणार आहे.