मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद अद्याप संपुष्टात आलेला नसताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच या कबुतरखान्याचे अनावरण करून त्याची माहिती समाजमाध्यमांवरून दिली आहे. श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील दादरचा कबुतरखाना बंद करण्यात आला. त्यातच हा नवीन कबुतरखाना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून सुरू झाल्यामुळे नवीनच वाद सुरू झाला आहे.

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी असे आदेश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने दुसऱ्याच दिवशी दादरच्या सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर कारवाई केली. कबुतरखान्यावरील अनधिकृत बांधकाम हटवले तसेच कबुतरांसाठी जमा केलेले खाद्यही हटवले.

पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा वाद अद्याप संपलेला नसताना मुंबईच्या उपनगरात आता एक नवीन कबुतरखाना तयार झाला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच या कबुतरखान्याचे अनावरण केले.

कबुतरांच्या विषयावर न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवून सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन लोढा यांनी यापूर्वी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केले होते. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करावे अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यातच आता हा नवीन कबुतरखाना सुरू झाला आहे.

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात कबुतरखाना सुरू केल्यामुळे नवीनच वाद सुरू झाला आहे. संजय गांधी उद्यान हे संरक्षित वन आहे. तेथे कबुतरखाना नको, पक्षी आपले अन्न स्वतःच शोधून मिळवू शकतात अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. जेथे हा कबुतरखाना सुरू झाला तो उद्यानाचा भाग नाही तर उद्यानाला लागून असलेले एक मंदीर आहे, अशी प्रतिक्रिया संजय गांधी उद्यानाच्या अधिकारी अनिता पाटील यांनी दिली.

संजय गांधी उद्यानाची आधी हद्द ठरवा

नव्यान तयार केलेला कबुतरखाना उद्यानाचा भाग नाही असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी हे गोंधळात टाकणारे उत्तर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द ठरवण्याची गरज आहे. या उद्यानाचा ८८ चौरस किमीचा भाग अधिसूचित आहे. तर सुमारे १८ ते २० चौर किमीचा भाग अधिसूचित नाही. त्यामुळे या भागावर अतिक्रमण होत असते, असे मत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते दयानंद स्टॅलिन यांनी व्यक्त केले आहे.

लोढा काय म्हणाले?

कबुतरे निसर्गाचा भाग आहेत. त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु, मानवी आरोग्यालाही बाधा पोहोचू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कबुतरखाने संजय गांधी उद्यानासारख्या मानव विरहित क्षेत्रात बनवणे हाच त्यावरील सुवर्णमध्य आहे, असे लोढा यांनी समाजमाध्यमांवर लिहिले आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात हा कबुतरखाना सुरू केल्याबद्दल दिगंबर जैन समाजच्या सर्व सदस्यांचे अभिनंदनही लोढा यांनी समाजमाध्यमांवरून केले आहे.