मुंबई : मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेले, विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदी भाषेत रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते संजय मिश्रा यांनी नाना फडणवीस आणि संतोष जुवेकर याने घाशीराम कोतवाल ही भूमिका साकारली आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे १४ व १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता होणार आहेत.

हिंदीतील ‘घासीराम कोतवाल’ नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी केले आहे, तर वसंत देव यांनी हिंदी भाषेत यापूर्वीच संहितेचे लेखन केले होते.

निर्मिती आकांक्षा ओमकार माळी आणि अनिता पालांडे यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’ने केली आहे. नाटकात संजय मिश्रा, संतोष जुवेकर, उर्मिला कानेटकर यांच्यासह ६० कलाकार पाहायला मिळणार आहेत. या नाटकासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवार, ३० जुलै रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ‘घासीराम कोतवाल’ हिंदी नाटकाचे संगीत मंदार देशपांडे यांनी केले आहे, विशेष बाब म्हणजे नाटकातील कव्वाली उर्दू भाषेत व लावणी मराठी भाषेतच ऐकायला मिळणार आहे.

नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक, वेशभूषा चैताली डोंगरे व बळवंत काजरोळकर यांनी केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अभिनयाच्या जुगलबंदीसह प्रत्यक्ष स्वरूपात सांगीतिक व नृत्याविष्कार पाहायला मिळेल.

‘मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एनएसडी) असताना ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हापासूनच या नाटकाबद्दल उत्सुकता होती. मी चित्रपटात व्यग्र होतो. पण नाटक करण्याची सुरुवातीपासूनच इच्छा होती. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भारतीय नाट्यसृष्टीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असे दर्जेदार नाटक आहे. त्यामुळे मी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात काम करण्यास तात्काळ होकार दिला. सर्व कलाकारांसह नृत्यांगना, नर्तक व गायक मेहनत घेत असून उत्तम काम करत आहेत. चित्रपटात अभिनय करणे ही माझी आवड आहे. त्यातून पैसा व प्रसिद्धीही मिळते. मात्र नाटकात काम करताना एक वेगळा अनुभव व समाधान मिळते आहे’, असे संजय मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इतरही कलाकृती इतर भाषांमध्ये

‘मला ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पाहायला मिळाले नव्हते. परंतु मी नाटकासंदर्भातील चर्चा तसेच लिखाण वाचले आहे. हे नाटक कालसुसंगत असून कधीही जुने होऊ शकत नाही. या नाटकातून करण्यात आलेले राजकीय भाष्य सार्वकालिक आहे. मराठीत दर्जेदार कलाकृती निर्माण झाल्या. मात्र मराठी साहित्य तसेच नाटक इतर भाषांत रूपांतरित करून अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठेतरी कमी पडलो आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘घाशीराम कोतवाल’ नाटकासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मराठीतील कोणत्याही दहा कलाकृती विविध भाषांमध्ये रूपांतरित करण्यासंदर्भात आमची चर्चा झाली’, असे अभिजीत पानसे म्हणाले. तसेच आम्ही लहानपणापासून अमिताभ बच्चन यांना पाहात आलो आहोत. लता मंगेशकर यांना ऐकत आलो आहोत. त्यामुळे जेव्हा आम्ही मराठी अस्मितेची चर्चा करतो तेव्हा आमचा इतर भाषेला विरोध नसतो, असे पानसे यांनी आवर्जून नमूद केले.

प्रयोग कधी

हिंदी भाषेतील ‘घासीराम कोतवाल’ नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबईतील वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे १४ व १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता होणार आहेत. त्यानंतर नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’ येथील टाटा थिएटरमध्ये २२ व २३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता प्रयोग सादर होणार आहे.