मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर – ठाणेदरम्यान विस्तार करीत आहे. या विस्तारीकरणाच्या कामासाठी ३२० झाडे कापावी लागणार असून ३८६ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएला मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. लवकरच ३२० झाडांची कत्तल, तर ३८६ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.

घाटकोपर -ते ठाणे असा प्रवास अतिजलद करण्यासाठी, पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर – ठाणे दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंदाजे १३ किमीचा आणि ४० मीटर रुंदीचा विस्तारीत मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गाच्या कामाला येत्या काही महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कामासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर येथील १६९४ झोपड्या हटव्याव्या लागणार आहेत. या झोपड्या हटविण्याच्या कामाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण डिसेंबरमध्ये सुरुवात करण्याची शक्यता आहे. या झोपड्या हटवून जागा ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीएकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पातील बाधित झाडे कापण्यासाठीची आवश्यक असलेली परवानगी एमएमआरडीएने उद्यान विभागाकडून मिळवली आहे. या प्रकल्पात ३२० झाडे कापावी लागणार असून ३८६ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. उद्यान विभागाकडून संयुक्त पाहणी करून ही परवानगी देण्यात आली असून या प्रकल्पात कुठेही बेकायेदशीर वृक्षतोड केली जाणार नाही, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणात कापण्यात वा पुनर्रोपित करण्यात येणाऱ्यां झाडांच्या बदल्यात ४ हजार १७५ नवीन झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी – घाटकोपरदरम्याच्या भागातील १२७ पिंक ट्रम्पेट झाडे वाचविण्यासाठी मार्गाच्या संरेखनात बदल करण्यात आल्याचेही एमएमआरडीएने सांगितले. झाडांचे पुनर्रोपण वैज्ञानिक पद्धतीने केले जाणार असून पुढे या झाडांची योग्य ती देखरेख केली जाईल. तर अधिकाधिक झाडांचे संवर्धन व्हावे यादृष्टीने त्यांचे पुनर्रोपण आणि देखरेख केली जाणार असल्याचेही एमएमआरडीएकडून आश्वासित करण्यात आले. दरम्यान नवीन ४ हजार १७५ झाडे प्रकल्प क्षेत्रातील मोकळ्या जागेत लावण्यात येणार आहेत.