मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्याचे काम सध्या वेगात सुरू असून या प्रकल्पाआड येणारे अडथळेही दूर होत आहेत. या प्रकल्पांतर्गत बोगदा खणण्याच्या कामालाही लवकरच सुरूवात होण्याची शक्यता असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येत्या काही वर्षात गोरेगाव – मुलुंडदरम्यानच्या प्रवासाचा वेळ पाऊण तासाने वाचणार आहे. एक तासाचा प्रवास २० मिनिटात होऊ शकणार आहे. तसेच प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होणार आहे.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. मुंबईत सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी सांताक्रूझ – कुर्ला जोडरस्ता (एससीएलआर), अंधेरी – घाटकोपर लिंक रोड (एजीएलआर) आणि जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) हे मार्ग आहेत. दोन्ही उपनगरांतील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे हे रस्ते पूर्ण क्षमतेने वापरले जात असून या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आता गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्याच्या रुपात एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
टीबीएमही प्रकल्पस्थळी
एकूण सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकल्पाची मांडणी चार टप्प्यात करण्यात आली आहे. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यांत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जुळा बोगदा तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्या या जुळ्या बोगद्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची १९.४३ हेक्टर जागा आवश्यक होती. ही जागा वळती करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच या बोगद्याचे काम सुरू करण्यासाठी खड्डा खणण्याकरीता झाडे हटवण्यासही लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. बोगदा खणण्यासाठी टीबीएम यंत्राचे सुटे भाग प्रकल्पस्थळी येत असून खड्डा खणण्याच्या बरोबरीने यंत्र जुळवण्याचे कामही केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जुळ्या बोगद्याचे काम सुरू होणार आहे.
असा असेल रस्ता
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड १२.२ किमी लांबीचा आहे. या मार्गादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४.७ किमी लांबीचा, तर फिल्मसिटीतून १.०२ किमीचा लांबीचा भुयारी रस्ता उभारण्यात येणार आहे. सध्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची रुंदी २४ मीटर असून भविष्यात भुयारी मार्गाच्या बांधकामांमुळे या रस्त्यांची रुंदी २७.४५ मीटर होणार आहे.