मुंबई : राज्यातील सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करू, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी केले.
राज्याचा ६६ वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा झाला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले, राज्य सरकारने काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. देश पाच लाख कोटी डाॅलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर आपल्या राज्याने एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दावोस जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने १५ लाख ७२ हजार कोटी रुपयांच्या ६३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून, यातून राज्यात सुमारे १५ लाख रोजगार मिळणार असल्याचेही राज्यपाल यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन
- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
- महाराष्ट्राकडे भारतातील सर्वांत पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
-महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून सर्वांना बरोबर घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निश्चय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.
विधानभवनात ध्वजवंदन विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी शेलार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
दिल्लीतही महाराष्ट्र दिन
राजधानी दिल्लीत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मीता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरजीत कौर अरोरा, दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते