मुंबई : राज्यात यंदा खरीप हंगामात १४६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, यापैकी अतिवृष्टी, महापुरामुळे आजअखेर ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास निम्मा म्हणजे सुमारे ४७ टक्के खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरीत राज्याला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा फेब्रुवारी ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या २७ लाख ४७ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्या शिवाय ऑगस्टमधील नजरअंदाजानुसार बाधित असलेले आणि पंचनामे सुरू झालेले क्षेत्र २३ लाख ४ हजार ८७१ हेक्टर आहे. चालू सप्टेंबर महिन्यात १८ लाख २० हजार ७६८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, यंदाच्या वर्षांत एकूण ६८ लाख ७२ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण खरिपाच्या ४७ टक्के क्षेत्राला फटका बसला आहे.

ऑगस्टअखेर राज्यातील २८ लाख ६८ हजार ४२ शेतकऱ्यांना अतिवृष्टी, महापुराचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी १ हजार ९९६ कोटी ४४ लाख रुपयांची गरज आहे, तर १ हजार ९८४ कोटी ९० लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. सप्टेंबरमधील बाधित क्षेत्र १८ लाख २० हजार ७६८ हेक्टर असून, त्याचे पंचमाने झाल्यानंतर नेमक्या नुकसानीची स्थिती समजेल. उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात पशूधनाचे आणि जमीन खरवडून गेल्यामुळे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर आणि सोलापुरात प्रत्येकी सुमारे तीन लाख हेक्टर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी दोन लाख हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. एकूण २३ जिल्ह्यांतील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

या पिकांचे नुकसान

खरीप हंगामातील सर्वच पिके बाधित. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, मका, कांदा, भुईमूग, तूर, मूग, उडीद, ऊस, भाजीपाला पिके, फळपिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन हातचे गेल्यात जमा आहे.

महिनानिहाय पीक नुकसान

फेब्रुवारी ते ऑगस्ट – २७ लाख ४७ हजार हेक्टर (पंचनामे पूर्ण)

ऑगस्ट – २३ लाख ५ हजार हेक्टर (पंचनामे अंतिम टप्प्यात)

सप्टेंबर – १८ लाख ३१ हजार हेक्टर (अद्याप पंचनामे सुरू नाहीत)