ओला व सुका कचरा असे वर्गीकरण अजून मुंबईकरांच्या अंगवळणी पडत नाही तोच पालिकेने आता घातक कचऱ्याचे विलगीकरण रहिवाशांवर बंधनकारक केले आहे. त्यामुळे ब्लेड, सुया, चाकू, खिळे, काचा, टय़ुबलाइट आणि सॅनिटरी नॅपकीन असा घातक कचरा आता वेगळा साठवावा लागणार आहे.

ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे आता नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. तर १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटय़ांना ओला कचऱ्यापासून आपल्याच आवारात खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओल्या व सुक्या कचऱ्याच्या संकलनासाठी व वहनासाठी आवश्यक तेवढे लहान व मोठे कॉम्पॅक्टर तसेच छोटय़ा बंद वाहनाची आणि तसेच एकाच गाडीत ओला व सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तशीच स्वतंत्र व्यवस्था घातक कचऱ्यासाठीही करण्यात येणार आहे.

घनकचरा व्यवस्थापनानुसार रोज उत्पन्न होणाऱ्या कचऱ्यापैकी ओला, सुका व घरगुती घातक कचरा (ब्लेड, टयुबलाइटस्, सॅनिटरी पॅड्स) अशा तीन प्रकारे वर्गीकरण करावे लागणार आहे. आतापर्यंत घरगुती घातक कचरा गोळा करण्यासाठी वेगळा विभाग नसल्याने सुक्या कचऱ्यातच घरगुती घातक कचरा गोळा करण्यात येत होता. परंतु प्रत्येक वाहनामध्ये बदल घडवून घरगुती घातक कचरा वेगळा गोळा करण्याची व्यवस्था करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे.

मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्मित करणाऱ्यांकडून सुका कचरा परस्पर भंगारवाल्यास विकला जातो किंवा महानगरपालिकेच्या विविध ४६ सुका कचरा संकलन केंद्रांना दिला जातो. ही सर्व कचरा संकलन केंद्रे कचरा वेचक संघटनांमार्फत चालविली जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या संघटनांना प्रत्येक घरातून केवळ सुका कचरा संकलन व वहनासाठी एकूण ९४ वाहने दिलेली आहेत. तसेच झोपडपट्टी विभागात ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत प्रति १५० एककासाठी लोकसहभागाद्वारे ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो.