मुंबई : मुंबई शहर तसेच उपनगरांत बुधवारी सकाळपासून अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान, गुरुवारीही मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या भागांत गुरुवारी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात जोरदार सरींची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यानंतर सायंकाळी हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला. सायंकाळनंतर या भागात पावसाने जोर धरला होता.
ठाणे येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १३ मिमी पावसाची नोंद झाली. शहर तसेच उपनगरांत दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, गुरुवारीही राज्यातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यात कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून काही भागात हलक्या सरी पडू शकतात.
दहिसर येथे सर्वाधिक पावसाची नोंद
गुरुवारी सकाळपासून दहिसर परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली. या भागात काही ठिकाणी पाणी साचले होते. तसेच राम मंदिर येथे २.५ मिमी पावसाची नोंद झाली.
सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत झालेली पावसाची नोंद
मरीन लाईन्स- १४ मिमी
नरिमन पॉइंट- १२ मिमीमुलुंड-२४ मिमी
पवई- १८ मिमी
वांद्रे-कुर्ला संकुल- २२ मिमी
आरे वसाहत- २० मिमी
वर्सोवा उदंचन केंद्र- १९ मिमी
राज्यात पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज
राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात पावसाचा अंदाज आहे.
वादळी पावसाचा अंदाज
यवतमाळ, चंद्रपूर , अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया
गडगडाटासह पावसाचा अंदाज
धाराशिव, लातूर आणि नांदेड
वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पाऊस
हिंगोली, बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी आणि नेवासे तालुक्यांतील काही गावांना अवकाळी पावसाचा तडखा बसला आहे. या पावसामुळे पपई, संत्र या फळबागांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले. पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरातील गावांमध्ये अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह या भागात गारा पडल्या.