मुंबई : मागील दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागात रविवारी देखील मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाली आहेत. त्याचाच प्रभाव म्हणून पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. प्रामुख्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण राज्यात वाढू लागलेल्या तापमानापासून दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर तसेच उपनगरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. मागील तीन दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते ५.३० पर्यंत २०.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २०.९ मिमी पावसाची नोंद झाली.
पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता अधिक असेल. मुंबई बरोबरच ठाणे, नवी मुंबई परिसरातही मुसळधार पाऊस पडेल. मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी या कालावधीत कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
ला-निनाचा प्रभाव
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १५ अंश सेल्सिअस तर इक्वेडोरजवळ ते १७ अंश सेल्सिअस इतके कमी असल्याने ‘ला-निना’चा प्रभाव वाढत आहे. या प्रभावामुळे पुढील काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा पावसाळा ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसाचा अंदाज कुठे ?
अतिमुसळधार पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
अतिवृष्टीचा इशारा – रत्नागिरी, रायगड, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर
मेघगर्जनेसह पाऊस – धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्या नगर, अकोला, भंडारा, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ