मुंबई : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारीही कायम आहे. गेल्या दहा तासांत पावसाने शहारासह दोन्ही उपनगरांना झोडपून काढले असून अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले आहेत. मात्र रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला. मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांना बाहेर फिरायला जाण्याचे बेत रद्द करावे लागले असून अनेकांनी सुट्टीच्या दिवशी घरातच बसणे पसंत केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर व उपनगरात रविवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. शनिवारी रात्री ८ ते रविवारी सकाळी ६ या दहा तासांत पश्चिम उपनगरात ७३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच, शहरात ६९.८० मिमी, तर पूर्व उपनगरांत ६३.७२ मिमी पावसाची नोंद झाली.

अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, कुर्ला रेल्वे स्थानक, मानखुर्द, टिळक नगर, शीव, मालाड, बोरिवली, कांदिवली, सांताक्रुझ आदी भागातील सखल भाग जलमय झाले आहेत.

नोकरदारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखतात. परंतु मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेकांना घरातच बसावे लागले आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज साधारणतः आकाश ढगाळ राहील. तसेच जोरदार ते अतिजोरदार पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात गुरुवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचबरोबर चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भरती – ओहोटी कधी ?

(रविवार, २८ सप्टेंबर)

भरती – दुपारी २:५५ वाजता – ३.२४ मीटर

ओहोटी – रात्री ८:५० वाजता – १.३१ मीटर

भरती – मध्यरात्रीनंतर ३:५८ वाजता (उद्या, २९ सप्टेंबर २०२५) – ३.४३ मीटर

ओहोटी – सकाळी ९:३८ वाजता (उद्या, २९ सप्टेंबर २०२५) – २.४५ मीटर