मुंबई : खरीप हंगामाला अतिवृष्टी, महापुराचा मोठा फटका बसला आहे. सध्या राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी आहे, अशी कबुली देतानाच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाढीव मदतीसाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविले. केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठावाड्यासह सोलापूर जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दिली जाणारी मदत अपुरी आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसांत पंचनामे पूर्ण करून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल. केंद्र सरकारकडून निश्चितपणे मदत मिळेल. केंद्राची मदत मिळताच दिवाळी पूर्वी सर्व बाधितांना मदत दिली जाईल, असेही भरणे म्हणाले.

राज्यात सप्टेंबर महिन्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. २६ जिल्ह्यांतील १७० तालुक्यांमध्ये ३२.३४ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर यंदाच्या वर्षात फेब्रुवारीपासून आजवर ३४ जिल्ह्यांतील सुमारे ६० लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यवतमाळ, अहिल्यानगर, जालना, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस आणि कडधान्ये ही खरिपातील मुख्य पिके असून, राज्यात १४६ हेक्टरपैकी सुमारे ११५ लाख हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे. अतिवृष्टी, महापुराचा सर्वाधिक तडाखा या पिकांना बसला आहे.

ओल्या दुष्काळाच्या निकषांनुसार मदत

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नसला तरीही ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर ज्या सवलती मिळतात, त्या सर्व सवलती आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला नाही, म्हणून मदत मिळणे बंद आहे, अशी स्थिती नाही. आपत्ती बाधितांना त्यांच्या पायावर उभे करण्याला आमचे प्राधान्य आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे सुरू केले आहे. मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहत बसले नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिले आहेत. बाधितांना पंचनामे होण्याची वाट न पाहता एक रकमी मदत दिली जात आहे. लोकांच्या संसार वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने दिलासा दिला जात आहे, असेही भरणे म्हणाले.