शनिवारी मध्यरात्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मनस्ताप सहन करावा लागला. पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर साचल्यामुळे सकाळी बराच वेळ मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बस वाहतूक देखील ठप्प झाली होती. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानंतर देखील मुंबईकरांना काहीसा दिलासा होता. मात्र, तो दिलासा फार काळ टिकला नाही. मुंबईच्या बहुतेक भागामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रामध्येच पाणी साचल्यामुळे ते बंद पडलं. त्यामुळे बाहेर बघितलं तर रस्त्यावर पाणीच पाणी, वर आकाशातूनही संततधार, पण घरातल्या नळाला मात्र टिपूस नाही, अशी अवस्था मुंबईच्या अनेक घरांमध्ये निर्माण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकरांसाठी दुहेरी संकट!

सायन, कुर्ला, घाटकोपर, दादर या ठिकाणी काल मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पाणी साचलं होतं. भांडुप परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखील पाणी शिरलं. त्यामुळे हे पंप हाऊस आणि इतर यंत्रसामग्री देखील बंद करावी लागली. भांडुपच्या याच जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईतल्या बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तेच बंद झाल्यामुळे मुंबईच्या अनेक भागांमधला पाणीपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आधीच रात्रीपासून संततधारेने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना पाणीटंचाईच्या दुहेरी संकटाचा देखील सामना करावा लागला.

 

Mumbai Local updates : अतिवृष्टीने मुंबईत हाहाकार! रेल्वे सेवेला ब्रेक; एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू

दरम्यान, पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. भांडुप जलशुद्धीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू झाल्यास पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rainfall in mumbai filtration drainage plants at bhandup water purification complex shut down pmw
First published on: 18-07-2021 at 13:45 IST