मुंबईला पुन्हा एकदा पावसानं वेठीस धरलं आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी रात्रीनंतर वाढल्यानंतर मुंबईत हाहाकार उडाला. मुंबईत अनेक ठिकाणी घरं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेलाही पावसाने ब्रेक लावला आहे. पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे. तीन रेल्वे मार्गांवरील अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने लोकल सेवा थांबवण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने याची माहिती दिली असून, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसापासून मुंबईत संततधार असून, शनिवारनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग सर्कल, कुर्ला अशा अनेक सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले. तर दुसरीकडे उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले.

तर पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांना कालव्याचं स्वरूप आलं होतं. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली. सकाळी ६ वाजता मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्याचबरोबर पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली असून, रेल्वे रुळावरील पाणी उपसण्याचं काम सुरू असल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी रेल्वे वाहतुकीबद्दल माहिती दिली. मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने तसेच विविध ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी आल्यानं वाहतूक थांबवण्यात आली असल्याचं सुतार यांनी म्हटलं आहे.

एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका बसला आहे. मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि राज्यातील विविध शहरादरम्यान धावणाऱ्या तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्या आता दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, दिवा आदी रेल्वे स्थानकांपर्यंत येणार आहेत.

हिंदमाताला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पालिकेचे पथक पंपांच्या माध्यमातून हे पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जोरदार पाऊस पावसामुळे रविवारी पहाटे बोरिवलीमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसरातही मुसळधार पाऊस झाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local updates mumbai rain train services suspended railway tracks waterlogged bmh
First published on: 18-07-2021 at 09:49 IST