मुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरणही अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पवसाचा अंदाज व्यक्त केला आहे. एकीकडे पावसाची शक्यता असताना सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यात शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान नोंदले गेले. मोसमी पावसाने शुक्रवारी संपूर्ण देशातून माघार घेतली. याचबरोबर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. सांताक्रूझ येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ते सरासरीपेक्षा अधिक होते. ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान साधारण ३३ अंश सेल्सिअस इतके अपेक्षित असते. यापूर्वी २०२३ मध्ये ३७.४ अंश सेल्सिअस, २०१८ मध्ये ३८ अंश सेल्सिअस, २०१५ मध्ये ३८.६ अंश सेल्सिअस आणि २०१४ मध्ये ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत असल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. एकीकडे तापमानाचा पारा चढा असताना राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. त्यांची दिशा दक्षिणेकडे झुकलेली आहे. त्यामुळे शनिवारी लक्षद्वीप परिसरात केरळ-कर्नाटक किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सध्या ऑक्टोबर हिटचा चटका अनुभवायला मिळत आहे. पुढील दोन – तीन दिवस तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.