मुंबई : मुंबईत शुक्रवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची त्रेधा उडाली. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील सखल भाग जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच, साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेचे कार्मगार – कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत होते. गोरेगाव, साकीनाका, मालाड, विलेपार्ले, भांडुप, घाटकोपर, शीव, कुर्ला आदी ठिकाणच्या सखलभागात पाणी साचले होते.
मुंबईत शहर विभागासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. उपनगरांतील अनेक रस्ते जलमय झाल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. जलमय झालेला अंधेरी भुयारी मार्ग सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. काही वेळात पाण्याचा निचरा झाल्यानंतर अंधेरी भुयारी मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दुपारच्या सुमारास पुन्हा भुयारी मार्गात सुमारे १ ते १.५ मीटर पाणी साचले.
परिणामी, मार्ग वाहतुकीसाठी बंद करून तेथील वाहतूक गोखले आणि ठाकरे पुलावरून वळविण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरही पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. संबंधित मार्गावरील खड्ड्यांमुळे पूर्वीपासूनच हैराण असलेल्या वाहनचालकांना पावसामुळे आणखी त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी सकाळी पाऊस सुरू झाल्यांनतर काहीच वेळात कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांनी पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. चेंबूरमधील एन. जी आचार्य मार्गावरील चौकात पाणी साचले होते. पन्नालाल कंपाउंड, एलबीएस मार्गही पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले.
आयआयटी मार्केट पवई येथील चैतन्य नगरातील रस्त्यावर पाणी तुंबल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यानापासून वारंवार तक्रार करूनही महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी तक्रारींकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
घाटकोपर येथील काही परिसरांतही पाणी साचले होते. गोवंडीतील झोपडपट्टी परिसरातील चाळींमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या नालेसफाईवरून सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्याविहार टर्मिनस मार्गालगतच्या भागात पाणी साचल्याने आसपासच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. विलेपार्ले श्रद्धानंद रोडही पाण्याखाली गेला होता.
महानगरपालिकेने यंदा पावसाळापूर्व नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा केला होता. तसेच, पाणी तुंबण्याच्या समस्या कमी होणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, मुसळधार पाऊस कोसळू लागताच अनेक भागांमध्ये पाणी साचू लागले. त्यामुळे पालिकेवर टीका होत आहे. नालेसफाईच्या कामांवरूनही अनेकजण नाराजी व्यक्त करीत आहेत.
सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी विविध ठिकाणी उदंचन संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. पाणी निचऱ्याचे काम विनाअडथळा सुरू रहावे, यासाठी महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच, हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसर, सांताक्रूझ येथील मिलन भुयारी मार्ग, चेंबूर येथील टेंभे पूल येथे वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.