मुंबई: बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, काम किंवा परीक्षेत येणारे अपयश, घरातील कुरबुरी यांसारख्या विविध बाबींमुळे नागरिकांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अनेकजण नैराश्यग्रस्त झाले आहेत. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. परंतु मानसिक आरोग्य बिघडलेल्या अनेकांना डॉक्टरांकडे जाण्यास कमीपणा वाटत असून ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑक्टोबर २०२२ पासून ‘टेलिमानस’ उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या ११ महिन्यांमध्ये ‘टेलिमानस कॉल सेंटर’ला राज्यातील १४ हजार ८७७ नागरिकांनी संपर्क साधून उपचार घेतले आहेत.

मानसिक आरोग्य बिघडले म्हणजे संबंधित व्यक्ती वेडी झाली असा सर्वसाधारण समज होतो. त्यामुळे अनेकजण कामाचा, घरातील ताण तणाव, बदलती जीवनशैली यामुळे मानसिक तणावाखाली वावरत असून, त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असली तरी ते मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यास तयार नसतात. नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने मानसिक तणावाखाली वावरत असलेल्या नागरिकांवर कोणालाही न कळता उपचार व्हावे यासाठी टेलिमानस हा उपक्रम सुरू केला. टेलिमानस कॉल सेंटरवर नागरिकांनी दूरध्वनी केल्यानंतर त्याला तेथील समुपदेशक व डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन व सल्ला दिला जातो. तसेच दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाते. त्यामुळे मागील ११ महिन्यांमध्ये टेलिमानसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत राज्यातील १४ हजार ८७७ नागरिकांनी टेलिमानस केंद्राशी संपर्क साधून उपचार करून घेतले आहेत.

हेही वाचा >>>शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार ; पत्नी, आई ते पुन्हा स्त्री होण्यापर्यंतच्या ‘सुखी’ प्रवासाची गोष्ट

टेलिमानस केंद्रावर पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक दूरध्वनी आले. त्याखालोखाल मुंबई व उपनगरातून ९५७, औरंगाबाद ९३०, बीड ७४४, नाशिक ५८८ आणि उस्मानाबाद ५७१ इतके दूरध्वनी आले आहेत. तर नंदूरबार जिल्ह्यातून सर्वात कमी अवघे ५६ दूरध्वनी आले आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: चेंबूरच्‍या शरद नारायण आचार्य उद्यानात बहरणार ‘नागरी वन’; ४८ देशी प्रजातींच्‍या १० हजार २६४ रोपांची लागवड

पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक दूरध्वनी

नागरिकांचा मानसिक तणाव दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टेलिमानस केंद्रावर सर्वाधिक दूरध्वनी पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या ५ हजार ६१८ दूरध्वनींपैकी कोल्हापूरमधून सर्वाधिक १७९९ इतके दूरध्वनी आले आहेत. त्याखालोखाल पुणे १७४४, सांगली १६२९ दूरध्वनी आले आहेत. तर सातारा जिल्ह्यातून सर्वात कमी ४४६ दूरध्वनी आले आहेत.