मुंबई : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी धार्मिकस्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर राज्य सरकार प्रामाणिकपणे कारवाई करत आहे. त्यामुळे, या प्रकरणी दाखल अवमान याचिका प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करून उच्च न्यायालयाने सरकारच्या या प्रयत्नांबाबत मंगळवारी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे, गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेली अवमान याचिका निकाली काढली.

कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन जवळपास नऊ वर्षे उलटल्यानंतर बेकायदा ध्वनिक्षेपकांवरील कारवाई म्हणावी तशी केली गेली नाही, अशी कबुली राज्याच्या पोलीस महासचालक रश्मी शुक्ला यांनी मागील सुनावणीच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली होती. त्याचवेळी, या प्रकरणी सतत कारवाईची आवश्यकता असून २०१६ सालच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करण्यासाठी मुदत मागितली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, याचिकाकर्त्याला माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात धार्मिक स्थळांवर २,९४० बेकायदा ध्वनीक्षेपक अद्यापही असल्याचे म्हटले होते. तथापि, २,९४० बेकायदा ध्वनीक्षेपकांपैकी ३४३ काढून टाकण्यात आले आहेत. तर, ८३१ नियमित परवानगी देण्यात आली व ७६७ जणांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या असून १९ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. शुक्ला यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारेच सरकारने हा दावा केला. याशिवाय, यापुढे बेकायदा ध्वनीक्षेपकांबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला सांगितले.

शुक्ला यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेऊन न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बेकायदा ध्वनीक्षेपकांवर पोलीस प्रामाणिकपणे कारवाई करत आहेत. तसेच, आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब लक्षात घेता अवमान याचिका प्रलंबित ठेवू शकत नाही, असे नमूद करून मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अवमान याचिका निकाली काढली. तथापि, याचिकाकर्त्यांना नियमांचे उल्लंघन झाल्याचे किंवा होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी या प्रकरणी देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्य अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे न्यायालयाने म्हटले.

दरम्यान, धार्मिक स्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कठोर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये सविस्तर आदेश दिला होता. परंतु, या आदेशाचे पालन झाले नसल्याने नवी मुंबईस्थित संतोष पाचलग यांनी अवमान याचिका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देखरेखीसाठी विशेष व्यवस्था

न्यायालयाच्या आदेशांचे पालन होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि तिमाही अहवाल सादर करण्यासाठी विशेष महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) यांची प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या समस्येवर सतत देखरेख आवश्यक असून सतत योग्य कारवाई केली जाईल, असे गृह विभागाने आश्वासित केले आहे. तर, पोलीस मोहल्ला समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत आणि ध्वनी प्रदूषण तक्रारींची नोंद ठेवली जात आहे. याशिवाय, ई-मेल, व्हॉट्स अँप, एक्स आणि ऑनलाइन संकेतस्थळांद्वारे आलेल्या तक्रारींवर कारवाई केली जात आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शेकडो प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले.