मुंबई : सध्या मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगरप्रदेशातील झाडांवर केली जाणारी दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब जनहित याचिकेच्या माध्यमातून बुधवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली. तसेच राज्य सरकारसह मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिकेला नोटीस बजावली.

याचिकेत व्यापक जनहिताचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारसह मुबई ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणांना या प्रकरणी चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा…‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित

ठाणेस्थित येऊर पर्यावरण संस्थेचे संस्थापक रोहित जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण आणि पक्ष्यांच्या जीवनावर विपरित परिणाम करत असल्याकडे या याचिकेत लक्ष वेधले आहे. तसेच, या समस्येवर तोडगा म्हणून आणि झाडांचे विविध प्रकारे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबर २०२३ पासून, मुंबई-ठाण्यातील अनेक झाडांवर दि्व्यांची सजावट करण्यात येत आहे.

त्यासाठी, उच्च-दाबाच्या विजेच्या तारा झाडांभोवती गुंडाळण्यात आलेल्या आहेत. या दिव्यांच्या सजावटीचा झाडांवर आणि त्यावर अधिवास करणारे पक्षी-कीटकांवर परिणाम होत असल्याने त्याबाबतची माहिती मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावून दिली होती. परंतु त्याला एकाही महापालिकेने प्रतिसाद न दिल्याने याचिका केल्याचे याचिकाकर्त्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

हेही वाचा…अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

सजावटीच्या दिव्यांमुळे पक्ष्यांवरही गंभीर परिणाम

नव्याने उदयास आलेल्या आणि पर्यावरणीय चिंता वाढविणाऱ्या प्रकाश प्रदूषणाचा अभ्यास करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार, आर्टिफिशल लाइट्स इन नाईट्स (एएलएएन) म्हणजेच रात्रीच्या वेळी झाडांवर लावण्यात येणाऱ्या सजावटीच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे वनस्पतींच्या नैसर्गिक चक्रांवर गंभीर परिणाम होतो. पक्ष्यांच्या अधिवासाला हानी पोहोचते. त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. साप, सरडा, विंचू, यांसारख्या प्राण्य़ांच्या नैसर्गिक चक्रांवरही परिणाम होत असल्याचे अभ्यासातून समोर आल्याचे याचिकाकर्त्यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले. अंधार हा वनस्पतींना प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमतेने करण्यासाठी आवश्यक असल्याचे लेखामध्ये नमूद केले होते याकडेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

हेही वाचा…ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

…हे झाडांना जाणीवपूर्व इजा करण्यासारखे

वनस्पतिशास्त्र विभाग, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, गुरु घसीदास विश्व विद्यालय, सीजी, बिलासपूर यांनी प्रकाशित केलेल्या लेखांचाही याचिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, प्रकाश प्रदूषणाचा विविध झाडे, वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो. झाडे सतत प्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या प्रकाशसंश्लेषण कार्यक्षमतेत बदल होत असल्याचे अभ्यासातून उघड झाले आहे. वृक्ष कायद्याच्या कलम २(क) मध्ये झाडाला जाणीवपूर्वक इजा करणे म्हणजे झाडाचे नुकसान करणे असल्याचे भट्टाचार्य यांनी न्यायालयाला सांगितले.