मुंबई : घर घेण्यासाठी विकासकांपासून दलालांपर्यंत सर्वांच्या कार्यालयात घालावे लागणारे खेटे, ऑनलाईन प्रकल्पांची मिळवावी लागणारी माहिती आणि अखेरीस सर्व गोंष्टींची शाहनिशा करताना सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड दमछाक होते. अखेर घर खरेदी केल्यानंतरही अनेकांची फसवणूक होत असल्याचेही उघडकीस आले आहे. तर प्रकल्प वेळेत पूर्णच न झाल्याने घराचे स्वप्न लांबल्याचेही दिसते. पण यापुढे मात्र घर खरेदी करणे सोपे होणार आहे, घर खरेदी-विक्रीत पारदर्शकता येणार आहे. तर विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. आता लवकरच महाराष्ट्रभरातील सर्व चालू प्रकल्पांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
नवीन गृहनिर्माण धोरणात महाराष्ट्रातील सुरू असलेल्या सर्व खासगी-सरकारी बांधकाम प्रकल्पाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल अर्थात शीप (द स्टेट हाऊसिंग इन्फाॅर्मेशन पोर्ट) पोर्टल विकसित करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. लवकरच हे पोर्टल विकसित करून कार्यान्वित करण्यात येणार आहे. हे पोर्टल कार्यान्वित झाल्यास महारेरा नोंदणीकृत सर्व खासगी-सरकारी प्रकल्पांची, प्रकल्पांतील घरांची माहिती घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रकल्पासंदर्भातील सर्व प्रकारची माहिती यावर असल्याने ग्राहकांना घर घेणे सोपे होणार आहेच, पण त्याचवेळी घर खरेदी-विक्रीत पारदर्शकता येणार आहे.
राज्यभरात घराची मागणी वाढती आहे. त्यातही परवडणाऱ्या घरांची मागणी अधिक आहे. अशा वेळी ग्राहकांना घर खरेदी करताना काम सुरू असलेल्या प्रकल्पांची, त्यातील घरासंबंधीची आवश्यक ती माहिती उपलब्ध होत नाही. अनेकदा ग्राहक प्रकल्पात घर नोंदणी करतात, पैसे भरतात, पण प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही, प्रकल्प कधी पूर्ण होणार याची माहिती मिळत नाही, कामाचा दर्जा, प्रकल्पाची सद्यस्थिती कळत नाही, प्रकल्पातील विकासकासंदर्भात कुठे तक्रार दाखल आहे या आणि अशा अनेक बाबींचीही माहिती उपलब्ध होत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. पण आता मात्र ग्राहकांना घर घेणे सोपे व्हावे, घरबसल्या सर्व काम सुरू असलेल्या प्रकल्पांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी शीप पोर्ट अर्थात राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल गृहनिर्माण धोरणात प्रस्तावित करण्यात आले आहे. हे पोर्टल लवकरच राज्य सरकारकडून विकसित केले जाणार आहे.
गृहनिर्माण क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूच्या विदा (डाटा) संकलन करून त्यावर आधारित विश्लेषण उपलब्ध करून देणे हे शीप या पोर्टचे प्रमुख कार्य असणार आहे. राज्यात कुठे आणि किती घरे बांधली जात आहेत याची रियल टाईमअंतर्गत माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. रेरा नोंदणीकृत खासगी प्रकल्पांसह, म्हाडा, सिडको, एसआरए, पीएमआयवाय अशा सरकारी प्रकल्पांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. कोणता प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत आहे हेही येथे समजणार आहे.
असे पोर्टल लागू करणारे पहिले राज्य ठरणार
प्रकल्प कोणत्या परिसरात आहे, त्या परिसरात शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधा, पायाभूत सुविधा, प्रकल्पातील घरांची संख्यात, घरांचे क्षेत्रफळ, प्रकल्प केव्हा सुरू झाला, किती काम पूर्ण झाले, प्रकल्प अधिकृत आहे का, प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, कोणता विकासक हा प्रकल्प राबवत आहे, प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहे का, प्रकल्पाविरोधात वा विकासकाविरोधात कोणती तक्रार, तसेच गुन्हा दाखल आहे का अशी सर्व प्रकारची माहिती ग्राहकांना एका ठिकाणीच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे पोर्टल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पोर्टल कार्यान्वित झाल्यास असे पोर्टल लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे हे विशेष.