गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे वातावरण तापलं होतं. या राजकीय नाट्याचा पुढचा अंक शनिवारी मध्यरात्री मुंबईच्या खार पोलीस स्थानकाबाहेर पाहायला मिळाला. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले होते. मात्र, परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. यासंदर्भात मुंबई पोलिस टीकेच्या केंद्रस्थानी असताना त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ”

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. “दोन घटना काल घडल्या आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून त्यांना अटक केली आहे. काल रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील”, असं वळसे पाटील म्हणाले.

“सगळ्यांनीच समजुतीनं घ्यावं”

दरम्यान, यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे. “दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

मुंबईत शिवसेना भाजपा संघर्ष शिगेला! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक; गाडीच्या काचा फुटून सोमय्या जखमी

पोलिसांना काय आदेश देणार?

या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुंबई पोलिसांच्या समोर किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केलं आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांना काही वेगळे आदेश देणार का? अशी विचारणा करताच दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं.

“पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचं काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे”, असं ते म्हणाले.

नेमकं काय घडलं मध्यरात्री?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी आजच्या नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामध्ये पोहोचले. एक ते दीड तास सोमय्या पोलीस स्थानकामध्ये होते. त्यानंतर पोलीस स्थानकामधून बाहेर पडताना पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister dilip walse patil on kirit somaiya car attacked stone pelting pmw
First published on: 24-04-2022 at 07:50 IST