मुंबई : डिजिटल युगात इंटरनेट व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मुळे आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होत असली तरी त्याचा अतिरेकी वापर आता आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. डॉक्टरांकडे थेट जाण्याऐवजी अनेकजण गुगल व चॅटजीपीटीसारख्या एआय साधनांवर अवलंबून राहतात. परिणामी किरकोळ वाटणारे लक्षण गंभीर आजाराचे रूप घेतात आणि शेवटी रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात न्यावे लागते.

मुंबईतील राजेश जाधव यांना जिमनंतर खांद्यात वेदना जाणवल्या. त्यांनी हे लक्षण किरकोळ दुखणे मानून गुगल व एआयवर घरगुती उपाय शोधले. मात्र काही दिवसांनी तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचे निदान झाले व थेट रुग्णालय गाठावे लागले. अर्चना देसाई या तरुणीला स्तनात गाठ जाणवल्यानंतर तीने इंटरनेटवर माहिती शोधली. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय सल्ला न घेता इंटरनेटवरील माहितीवर विश्वास ठेवत ती गाठ निरुपद्रवी असल्याचे तिला वाटले. पण काही महिन्यांनी तिला ‘स्टेज २ ब्रेस्ट कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. ठाण्यातील राजू कदम यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला. छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी ऑनलाइन माहितीवर विश्वास ठेवला. प्रत्यक्षात त्यांनाही ह्रदयविकाराचा त्रास असल्याचे तपासणीत दिसून आले. अलीकडच्या काळात एक मोठा वर्ग डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी स्वत:च्या आजाराचे स्वत:च निदान इंटरनेट तसेच एआय टुल्सच्या माध्यमातून करताना दिसतात. एवढेच नव्हे तर अनेकदा आमच्याकडे आल्यानंतरही रुग्ण त्याच्या आजाराचे विश्लेषण करून काय उपाय केले पाहिजे ते आम्हालाच सांगतो, असे असे ठाण्यातील डॉ पराग देशपांडे म्हणाले.

यातील महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकदा एआय व इंटरनेटवर अवलंबून राहिल्यामुळे ‘सायबरकाँड्रिया’ नावाची नवी समस्या उद्भवते आहे. इंटरनेटवरील माहिती वाचून रुग्णांमध्ये अनावश्यक भीती किंवा ताण वाढतो. किरकोळ आजार गंभीर वाटतो किंवा गंभीर आजार हलका वाटतो. त्यामुळे निदान व उपचार उशिरा होतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.एआय साधने लक्षणे समजून घेण्यास मदत करू शकतात. पण निदान आणि उपचार केवळ प्रशिक्षित डॉक्टरच करू शकतात. रुग्ण उशिरा रुग्णालयात येतात कारण त्यांना गुगल किंवा एआयने ‘हे गंभीर नाही’ असे सांगितलेले असते.डोकेदुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, शरीरावर गाठ यांसारखी लक्षणे किरकोळ समजू नका. एआय व इंटरनेट केवळ माहिती देणारी साधने आहेत, निदान आणि उपचार करण्याचा अधिकार फक्त डॉक्टरांनाच आहे. त्यामुळे कोणतीही शंका वाटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. एआय तुमची लक्षणे ओळखू शकते, पण तुमचा जीव वाचवू शकत नाही. ते काम फक्त डॉक्टरच करू शकतात असे केईएमच्या ह्रदयविकार विभागाचे प्रमुख डॉ अजय महाजन यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असून लक्षण तपासणी, प्राथमिक निदान, औषध सुचविणे आणि तपासणी अहवालांचे विश्लेषण यासाठी मोठ्या प्रमाणावर एआय आधारित साधनांचा वापर होत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेल्या नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन प्रोग्रेस रिपोर्ट २०२४ नुसार देशभरातील तब्बल ३२ टक्के लोक प्राथमिक आरोग्य सल्ल्यासाठी एआय प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. यापैकी जवळपास ८ टक्के रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता केवळ एआय च्या शिफारशींवर उपचार सुरू केल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही हे चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. राज्य आरोग्य विभागाच्या आरोग्य माहिती अहवालानुसार मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण प्राथमिक सल्ल्यासाठी एआय साधनांचा वापर करताना दिसतात.

‘एआय’ नव्हे तर डॉक्टरच महत्वाचे

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंट रिपोर्ट २०२३ नुसार एआयचे निदान काहीवेळा अचूक ठरते मात्र अनेक प्रकरणात ते चुकीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या निदानामुळे औषधांचा गैरवापर, योग्य वेळेत उपचार न होणे आणि गंभीर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होणे अशा समस्या उघडकीस आल्या आहेत. याचाच धागा पकडत भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) देखील चिंता व्यक्त केली आहे.एआयसारखी साधने मदतीसाठी आहेत, मात्र ती डॉक्टरांचा पर्याय होऊ शकत नाहीत. विशेषत: हृदयरोग, मधुमेह, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांत एआय निदानावर उपचार सुरू करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आरोग्य सेवेत एआयचा उपयोग नाकारता येत नाही. जलद निदान, प्राथमिक सल्ला, ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत डिजिटल सुविधा पोहोचवणे यासाठी ते उपयुक्त ठरत आहे. पण, रुग्णांचा या तंत्रज्ञानावर वाढता अवाजवी विश्वास आणि डॉक्टरांचा पर्याय म्हणून त्याकडे पाहण्याची प्रवृत्ती ही आरोग्य व्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरत आहे.