‘न्हाणीघरां’ची घरे बनवली!

‘म्हाडा’कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निशांत सरवणकर

नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासात हात धुवून घेण्याचा प्रयत्न; सार्वजनिक बांधकाम विभागातील नऊ अधिकाऱ्यांवर ठपका

‘म्हाडा’कडून सुरू असलेल्या नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात हात धुऊन घेत सार्वजनिक बांधकाम विभागातील नऊ  अधिकाऱ्यांनी चक्क या चाळीत असलेली ‘न्हाणीघरे’ अर्थात सार्वजनिक मोरी आपल्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ही ‘न्हाणीघरे’ही आता या योजनेत ‘लाभार्थी’ ठरली आहेत. म्हाडाने या बाबीची गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.

‘म्हाडा’कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाकडून ‘बीडीडी’वासीयांना प्रत्येक घरामागे ५०० चौरस फुटांचे घर मिळणार आहे. नायगाव येथील पात्रता यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केली आहे. या यादीत चाळीतील नऊ  न्हाणीघरांच्या जागी खोल्या दाखवून त्यांचे भाडेकरू म्हणून नोंद असल्यामुळे रहिवासीही अवाक् झाले. या खोल्यांच्या नावे विजेचे मीटर, भाडेपावत्या असल्याची बाबही उघड झाली आहे. नायगाव बीडीडी चाळ रहिवाशी संघटनेने या बाबत म्हाडाकडे रीतसर तक्रार केली. या चाळीत सामाईक न्हाणीघरे होती. परंतु त्यांचा वापर होत नव्हता. त्यामुळे ही जागा बंदिस्त करून घेऊन खेळण्यासाठी वा अभ्यासाची खोली म्हणून वापरली जात होती. पुनर्विकास प्रकल्प जाहीर झाला आणि देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकल्पासाठी पात्रता यादी सादर करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली होती. या यादीची शहानिशा नायगाव विभागाच्या उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) यांनी केली. या यादीत न्हाणीघरांऐवजी निवासी घरे दाखविण्यात आली होती. तसेच ही घरे चाळीची देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील आठ अधीक्षक आणि एका लिपिकाच्या नावे असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक भोसले याबाबत अधिक तपास करीत आहेत. मात्र त्यांनी या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्याऐवजी हे प्रकरण पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वरळीतही तीन खोल्या लाटल्या!

वरळी येथील पुनर्विकास प्रकल्पात पालिका शाळेच्या सात खोल्या होत्या. त्यांपैकी तीन खोल्या विकण्यात आल्याची गंभीर बाबही उघड झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

‘न्हाणीघरा’चे लाभार्थी

एस. बी. अहिरे, सी. डी. नलावडे, आर. डी. धनविजय, एम. वाय. घाणेश्वर, एम. डी. घोडे, ए. ए. देसाई, ए. एस. माने, एस. आर. सोनावणे (सर्व चाळ अधीक्षक), वाय. एम. पिंजारी (चाळ लिपिक)

या गैरप्रकाराबाबत तक्रार येताच गंभीर दखल घेऊन पुढील कारवाईसाठी म्हाडा उपाध्यक्षांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना कळविण्यात आले आहे.

– सिद्धेश्वर कोन्नूर, कार्यकारी अभियंता, बीडीडी चाळ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Illegal in naigaon bdd chal redevelopment